Tur Dal Rate: मुंबई APMC मार्केटमध्ये तूर डाळीच्या भावात 10 रुपयांनी वाढ, 150 पर्यंत जाण्याची शक्यता
नवी मुंबई   - मुंबई APMC धान्य मार्केट घाऊक बाजारात   तूर डाळीचे भाव गगनाला भिडणार आहेत. त्यामुळे साधा वरणभात करतानाही गृहिणींना विचार करावा लागणार आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये घाऊक बाजारात तूरडाळ थेट ११५ ते १२५ रुपये किलो झाली आहे. तर किरकोळ बाजारात आता एक किलो तुरीसाठी १२५ ते १४० रुपये मोजावे लागत आहे.
सर्वसामान्यांच्या ताटातील पौष्टिक खाद्य पदार्थ म्हणून डाळीकडे पाहिले जाते. आता ही महाग झाल्याने घरात खावे तरी काय असा प्रश्न पडू लागला आहे. येत्या काही दिवसात तूर डाळीच्या दरात वाढ होऊन १५० रुपये प्रतिकिलो होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
गेल्या पंधरा दिवसापासून तूर व हरभरा डाळीच्या किमतीत दररोज वाढ होत आहे.मार्केटमध्ये   आवक कमी झाल्याने तूर डाळींचे दर प्रतिकिलो १० रुपयांनी वाढले आहे. आवक कमी असल्याने साठेबाजांनी तुरीची साठवण केलेली आहे.
त्यामुळेच कृत्रिमरित्या ही भाववाढ केल्याची चर्चा बाजारात नव्याने होत आहे. बाजारात तुरीची आवक कमी झालेली असल्याने भाव वाढ सुरू झाल्याचे बोलले जात आहे.
गेल्या पंधरा दिवसापूर्वी तूर डाळीचे प्रतिकिलो   १०५ ते ११० रुपये होते. ते ११५ ते १२५ रुपयांवर पोहोचले आहेत. तूर डाळीचे उत्पादन घटल्याने ही भाववाढ सुरु आहे.तूर डाळींच्या दरात १५ टक्क्यांपेक्षा अधिक भाववाढ झालेली आहे.   सरकारने वेळीच हस्तक्षेप केला नाही, तर तूर डाळीचे भाव पुन्हा एकदा वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.