दिवाळीच्या दोन दिवस आधी वाशी एपीएमसीत खरेदीचा उत्सव; बाजारपेठ फुलून गेली!दिवाळीच्या दोन दिवस आधी वाशी एपीएमसीत खरेदीचा उत्सव; बाजारपेठ फुलून गेली!
.png)
दिवाळीचा जल्लोष! वाशी एपीएमसी बाजारात दिवे, तोरणे आणि खरेदीदारांची गर्दी
दिवाळीपूर्वी वाशी एपीएमसी बाजारपेठेत ग्राहकांची प्रचंड गर्दी
कंदील, तोरणे, दिवे आणि किराण्याच्या खरेदीने एपीएमसी बाजार गजबजला
नवी मुंबई :
दिवाळीचा सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपल्याने वाशीतील एपीएमसी बाजारपेठेत उत्साहाची लाट उसळली आहे. बाजारपेठेत खरेदीदारांची प्रचंड गर्दी असून, दिवे, तोरणे, कंदील, घर सजावटीचे साहित्य, तसेच किराणा मालाच्या खरेदीने बाजार फुलून गेला आहे.
वर्षातील सर्वात मोठा सण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिवाळीच्या निमित्ताने एपीएमसी बाजारपेठ रंगीबेरंगी सजली आहे. मातीच्या पणत्या, सुगंधी मेणाचे दिवे, फुलांच्या व फळांच्या आकाराचे दिवे ग्राहकांचे विशेष लक्ष वेधून घेत आहेत. प्लास्टिक, कपड्याचे व मोत्याच्या मण्यांच्या तोरणांची विक्रीही जोमात सुरू आहे. या तोरणांची किंमत ५०० रुपयांपासून ते ३ हजार रुपयांपर्यंत आहे.
कागद, प्लास्टिक आणि कपड्यांपासून तयार केलेले आकाशकंदील बाजारात झगमगत आहेत. रंगीबेरंगी दिव्यांच्या माळा आणि घर सजावटीचे साहित्यही ग्राहकांना आकर्षित करत आहे. प्रत्येक दुकानाने मोकळ्या जागेत व पदपथावर स्टॉल्स लावल्याने बाजारपेठेत पाय ठेवायलाही जागा उरलेली नाही.
पूर्वी दिवाळीची खरेदीसाठी नागरिकांना मुंबईतील क्रॉफर्ड मार्केट किंवा दादरकडे जावे लागत असे मात्र आता एपीएमसी बाजारात सर्व साहित्य एकाच ठिकाणी मिळत असल्याने नवी मुंबईतील नागरिकांनी वळवलेली गर्दी या ठिकाणी दिसत आहे.
दरम्यान, अन्नधान्य व किराणा खरेदीसाठी देखील एपीएमसी बाजारात मोठी गर्दी दिसत आहे. बाहेरील किरकोळ बाजारपेठेपेक्षा २० ते ३० टक्के स्वस्त दर मिळत असल्याने ग्राहकांची पसंती वाढली आहे. कटलरी आणि घरगुती वस्तूंवरही सवलती दिल्या जात आहेत. त्यामुळे दिवाळीपर्यंत हा खरेदीचा उत्साह कायम राहणार असल्याचा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.