मी काय चुकीचं लिहिलं? माझ्यावर का खापर फोडताय? संजय राऊतांचा अजितदादांना सवाल
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय चाललंय, हे इतरांनी कुणी सांगू नये. आम्ही कुणालाही वकीलपत्र दिलेलं नाही. ज्याने त्याने आपल्या मुखपत्रातून आपल्या पक्षाविषयी लिहावं, अशा शब्दात अजित पवार यांनी काल संजय राऊत यांना थेट खडसावलं. यावरून संजय राऊत यांनी आज प्रत्युत्तर दिलंय. मी सामनाच्या अग्रलेखातून काहीही चुकीचं लिहिलेलं नाहीये. विरोधकांना फोडण्याचे प्रयत्न सुरु नाहीत का? मी सत्य लिहिलंय आणि सत्य बोलण्याची हिंमत ठेवतो. अजितदादांनी सांगावं, असं घडत नाहीये का, असा सवाल संजय राऊत यांनी केलाय. महाविकास आघाडीत आम्ही अजित पवारांवर प्रेम करतो. पण हा पक्ष फुटत असताना आम्ही चिंता व्यक्त करण्यात काहीही चुकीचं नाही, असं स्पष्टीकरण संजय राऊत यांनी दिलं.
कुणा-कुणावर दबाव?
संजय राऊत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक वरिष्ठ नेत्यांवर दबाव असल्याचं स्पष्टच सांगितलं. आजच्या पत्रकार परिषदेत त्यांनी या नेत्यांची नावंही घेतली. पवार कुटुंबियांवर दबाव असल्याचं संजय राऊत यांनी आधीच सांगितलं होतं. पण राष्ट्रावादी काँग्रेसमधील हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, प्रफुल्ल पटेल आदी नेत्यांवरही दबाव असल्याचं राऊत यांनी आज नाव घेऊन सांगितलं. ज्या प्रकारे केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव आणून भाजप ऑपरेशन करतंय. यावर आम्ही बोललो तर भाजपला राग यायला हवा. इतर कुणाला राग यायचं कारण नाही, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.
माझ्यावर का खापर फोडताय?
मी महाविकास आघाडीचा चौकीदार आहे. त्यामुळे मी बोललो. अजितदादा माझ्यावरच खापर का फोडतायत? शिवसेना फुटली तेव्हाही तुम्ही आमची वकिली करत होता. आपल्या बरोबरचा घटकपक्ष मजबूत रहावा, त्याचे लचके तुटले जाऊ नये, ही आमची भूमिका असेल, तरीही कुणी आमच्यावर खापर फोडत असेल तर गंमत आहे, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलंय.
मी सत्य बोलतच राहीन..
खरं बोलल्यामुळे मला कुणी टार्गेट केलं आणि त्यामुळे मी मागे हटेन, असं वाटत असेल तर तसं नाहीये. मी नेहमीच खरं बोलतो. कुणाच्या बापाला घाबरत नाही. सामनात नेहमीच सत्य लिहिलं जातं. त्यात लपवण्यासारखं काहीच नाही, असं प्रत्युत्तर राऊत यांनी दिलंय.
शिवसेना फोडली तसाच प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फोडण्यासाठी सुरु आहे, असा दावा संजय राऊत यांनी रविवारच्या सामनातील अग्रलेखातून केला होता. त्यानंतर राजकारणात असंख्य घडामोडी वेगाने घडताना दिसल्या. मात्र अजित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेत, असं काहीही घडलं नसल्याचं स्पष्टीकरण दिलं. तसंच संजय राऊत यांच्यावर असे दावे केल्याने टीकाही केली.