शेतकऱ्यांच्या संकटांचा THE END कधी होणार!
मुंबई: शेतकऱ्यांच्या संकटांचा THE END कधी होणार , प्रत्येक शेतकरी अडचणीत सापडलाय कुणी टोमॅटो रस्त्यावर फेकून देत आहे शेतकरी अगदीच हतबल झालाय. कांदा काढणीच्या अंतिम टप्प्यात वादळी वाऱ्यासह गारपीट व पावसाने सर्वत्र दाणादाण उडवली. आता कांदा साठवण्यापूर्वीच तो सडला तर काही कांदा चाळीस सडू लागला आहे, अशी बिकट परिस्थिती असतानाही कांद्याला उत्पादन खर्चाच्या खाली भाव मिळत आहे.
मात्र लोकप्रतिनिधी काहीही बोलत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचा संतापाचा भडका दिवसेंदिवस वाढत असल्याची स्थिती आहे.
कसमादे भागात वातावरण तापत आहे. त्याचाच प्रत्यय म्हणजे सटाणा तालुक्यातील मुंजवाड येथील ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी व सर्वपक्षीय राजकीय पुढाऱ्यांना गावात प्रवेशबंदी घोषित केली आहे.
मुंजवाड येथील कांदा उत्पादक व शेतकरी क्रांती मोर्चा ग्रुपच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत एकमुखाने निर्णय घेत ग्रामस्थांनी गावात प्रवेश करणाऱ्या सर्व प्रमुख रस्त्यांवर या गावबंदीचे फलक झळकविण्यात आले. राजकीय पुढाऱ्यांनी गावात प्रवेश केल्यास त्यांच्यावर कांदे फेकून त्यांचे स्वागत केले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.
नैसर्गिक संकटातून कशाबशा बचावलेल्या उत्पादनालाही बाजारपेठेत अत्यल्प दर मिळत आहे. सद्यःस्थितीत चांगल्या प्रतीचा कांदा अवघ्या २ ते ४ रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे.
यातून उत्पादन खर्च दूरच, पण नुसते बाजार समितीपर्यंत माल नेण्याचा वाहतूक खर्चही वसूल होत नसल्याची भीषण स्थिती आहे.
मात्र राजकीय पुढाऱ्यांकडून मात्र याकडे सपशेल दुर्लक्ष केले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या मनात मोठ्या प्रमाणात असंतोष धुमसत असून त्याची परिणिती म्हणून मुंजवाड ग्रामस्थांनी थेट राजकीय पुढाऱ्यांसाठी प्रवेशबंदी जाहीर केली आहे.