सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार? उज्ज्वल निकम यांनी दिली महत्वाची माहिती
मुंबई : महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाच्या (Maharashtra Political Crisis) सुनावणी पूर्ण झाली. तब्बल 9 महिन्यांच्या युक्तिवादानंतर महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा फैसला काय येणार? याची उत्सुकता फक्त राज्यालाच नाही तर देशाला लागली आहे. या सुनावणीनंतर आता सर्वोच्च न्यायालय काय निकाल देऊ शकतो? यासंदर्भात चर्चा सुरु असतात. अंदाज बांधले जात असतात. आता सर्वोच्च न्यायालायचा निकाल कधी येणार? याबाबत ज्येष्ठ सरकारी वकील आणि कायदेतज्ज्ञ उज्ज्वल निकम यांनी महत्वाची माहिती दिली.
काय म्हणाले उज्ज्वल निकम
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षाचा निकाल केव्हा लागेल, हे आत्ता जरी सांगणे कठीण आहे. परंतु माझ्या मते सर्वोच्च न्यायालयातील घटनापीठातील काही न्यायमूर्ती निवृत्त होत आहे. त्यापूर्वी हा निकाल लागले. यामुळे सत्ता संघर्षाचा निकाल लवकर लागेल, अशी अपेक्षा उज्ज्वल निकाम यांनी व्यक्त केली.
न्यायालयात जोरदार युक्तीवाद
सर्वोच्च न्यायालयात शिंदेंकडून हरिश साळवे, महेश जेठमलानी, नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. तर ठाकरेंकडे कपिल सिब्बल, अभिषेक मनुसिंघवी आणि देवदत्त कामतांनी युक्तिवाद केला.
राजकारणात येण्याचा विचार नाही..
सध्या राजकारणात अस्थिरता आणि गढुळता आहे. त्यामुळे सध्यातरी माझ्यासारख्या व्यक्तींनी राजकारणात येणं योग्य नाही, असं माझं मन सांगत आहे, असे उज्ज्वल निकाम यांनी सांगितले.
पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे सुनावणी
 
राज्याच्या सत्तासंघर्षाची सुनावणी सर्वोच्च न्यायालयात 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठापुढे झाली होती. त्यातील न्यायमूर्ती एम. आर. शाह हे 15 मे रोजी निवृत्त होणार आहेत. त्यामुळे 14 मेच्या आधी हा निकाल लागण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून एखाद्या प्रकरणाचा निकाल दिला जाणार, हे आदल्या दिवशीच जाहीर केले जाते. न्यायालयाच्या कामकाजाच्या यादीत एक दिवस आधी त्या निकालाची तारीख दिलेली असते. त्यामुळे राज्याच्या सत्तासंघर्ष प्रकरणाचा निकाल लागेल तेव्हा एक दिवस आधीच त्याची तारीख जाहीर होईल. ही तारीख नेमकी काय असणार? याची उत्सुकता आहे. सत्तासंघर्षाच्या या निकालावरच महाराष्ट्राचे राजकीय भवितव्य अवलंबून आहे.