“शेतकऱ्यांचे रक्त पिणाऱ्यांना खपवून घेणार नाही” - बोगस बियाणे विकणाऱ्यांना कृषीमंत्र्यांचा दणका…
मुंबई: राज्यातील शेतकरी वेगवेगळ्या समस्यांनी ग्रस्त असतानाच बोगस बियाणे विकणाऱ्यांचाही राज्यात सुळसुळाट झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यावर आता थेट कृषीमंत्र्याकडूनच कारवाईला सुरुवात झाली आहे. एकीकडे शेतकऱ्यांवर चहूबाजूंनी संकट येत असतानाच पेरणी करण्यासाठी बियाणे खरेदी केल्यानंतर मात्र काही बियाणे बोगस निघत आहेत. त्यामुळे एकीकडे शेतकऱ्यांवर निसर्गाचे संकट तर दुसरीकडे बोगस बियाणांची पेरणी झाल्यामुळे योग्यरित्या उगवण होत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढावत आहे. त्यामुळेच आता कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी थेट कारवाईला सुरुवात केली आहे.
त्यावर बोलताना अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, मी कोणतेही चुकीचे काम केलेले नाही, नियमानुसार पथके तयार केली आहेत धाड टाकल्या आहेत. त्यामुळे टीका केली तरी ही कारवाई चालूच राहणार अशा स्पष्ट शब्दात त्यांनी टीकाकारांना उत्तर दिले आहे.
शेतकऱ्यांचे रक्त पिणाऱ्या व्यापाऱ्यांची बाजू घेऊ नका, बोगस बियाणे असतील, बियाण्यांची साठवणूक असेल आणि चढ्या दराने माल विकत असतील तर ते कोणत्याही प्रकारे खवपून घेतले जाणार नाही अशा स्पष्ट शब्दात त्यांनी व्यापाऱ्यांना इशारा दिला आहे.
अब्दुल सत्तार यांनी सांगितले की, आमच्या पथकाकडून रेड टाकल्यानंतर 7 दुकानवाले गोडाऊन बंद करून पळून गेले आहेत.बियाणांची उगवण शक्ती किती आहे हे तपासणार जे टॅग वर दाखवलेले आहे ते बियाण्यांमध्ये आहे का ? की वरून ओरिजिनल आतून बोगस याबद्दलची तपासणी केली जाणार आहे. तसेच आता चलती फिरती लॅब आणणार असून प्रत्येक जिल्ह्यातून बियाणे तपासणार असल्याच इशाराही त्यांनी दिला आहे.
मी कोणता भ्रष्टाचार केला आहे, लोकं फक्त आरोप करत असतात, अधिकारी पैसे मागितले तर अँटी करप्शनकडे जा आणि तक्रार करा नोटा द्या आणि लोकअपमध्ये टाका नुसते आरोप काय करत आहात असा सल्ला त्यांनी दिला आहे.
अब्दुल सत्तार यांच्यावर टीका करणाऱ्यांना त्यांनी उत्तर देताना म्हटले आहे की, माझ्या विरोधात टीका करण्याचा हा खेळ सुरू आहे पण टीका करणाऱ्यांवरच मी हा खेळ उलटवणार आहे. जो माझ्याबाबती जी व्यक्ती खेळ करत आहे त्याचे नाव मी मुख्यमंत्र्यांना सांगितले असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
शेतकऱ्यांना तक्रार करता यावी यासाठी आम्ही आता टोल फ्री नंबर दिला आहे. त्यामुळे 18002334000 या नंबरवर कॉल केल्यानंतर त्यावर आम्ही तातडीने कारवाई करू असा इशाराही त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांचे बियाणे उगवले नाही तर शेतकऱ्यांचा सगळा खर्च मी त्या कंपनीला द्यायला लावणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.