काल नाशिक, आज अहमदनगर आणि आता धाराशिव, 24 तासांच्या आत मुख्यमंत्र्यांचा दौऱ्यांचा धडाका
मुंबई : राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. या नुकसानीमुळे शेतकरी अक्षरश: हवालदिल झाले आहेत. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसामुळे हाहाकार उडाला आहे. अनेक शेतकऱ्यांचं स्वप्न उद्ध्वस्त झाली आहेत. शेतातला माल विकून चांगलं आयुष्य जगावं, इतकीच त्यांची भाबडी अपेक्षा होती. पण नियतीने त्यांच्या नशिबात काहीतरी वेगळंच लिहिलं होतं. अचानक वादळी वारे वाहू लागले, पाऊस सुरु झाला, गारा पडल्या आणि होतं नव्हतं ते सारं पीक कोलमडून पडलं. तळहाताच्या फोडापेक्षा जास्त ज्या पिकांची काळजी घेतली तीच पीकं अवकाळी पावसामुळे नष्ट झाली. शेतकऱ्यांवर कोसळलेल्या या संकटानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी नुकसानग्रस्त भागांची पाहणी दौरा करण्याचा धडाकाच लावला आहे.
एकनाथ शिंदे यांनी काल नाशिक जिल्ह्यात जाऊन अवकाळी पडलेल्या पावसामुळे नुकसान झालेल्या शेतीची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान त्यांनी शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेतलं. सर्व शेतकऱ्यांना भेटण्याचा प्रयत्न केला. या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचं आश्वासन दिलं. त्यांच्या या दौऱ्यानंतर तातडीने कृषी विभागाने नाशिक जिल्ह्यातील परिस्थितीचा अहवाल शासन दरबारी सादर केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राज्य सरकारने काल तब्बल 177 कोटी रुपये राज्यभरातील जिल्ह्यांना मदतीसाठी वाटले. अधिकारी पंचनामे करुन लगेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून हे पैसे देणार आहेत.
एकनाथ शिंदे नाशिकनंतर अहमदनगरमध्ये दाखल
एकनाथ शिंदे यांनी काल नाशिक दौरा केल्यानंतर आज सकाळी ते अहमदनगरतच्या दौऱ्याला निघाले. तिथेदेखील त्यांनी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. तिथेही ते शेताच्या बांधावर पोहोचले. या दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अहमदनगरच्या वनकुटे गावात नुकसानीची पाहणी करण्यात आली. मुख्यमंत्र्यांनी हिरामण बर्डे यांच्या घराची पाहणी केली. अवकाळी पावसामुळे बर्डे यांच्या घराचं नुकसान झालंय. वनकुटे गावात अनेक घरांची पडझड झाली आहे.