Breaking: नागपूरच्या हिंगणा येथील कटेरिया ॲग्रो कंपनीला भीषण आग, आगीत ३ कामगारांचा होरपळून मृत्यू
नागपूर : नागपूरच्या हिंगणा एमआयडीसी भागातील कटेरिया ॲग्रो कंपनीला आज दुपारी भीषण आग लागली. गेल्या एक तासापासून ही आग भडकतच आहे. अग्निशमन दलाचे जवान गेल्या एक तासापासून ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, आग विझण्याऐवजी भडकतानाच दिसत आहे. त्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. या आगीत आतापर्यंत तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर आगीत तब्बल 20 ते 30 कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
नागपूरच्या हिंगणा एमआयडीसी भागातील कटेरिया ॲग्रो कंपनीला आज दुपारी भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत तीन कामगारांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत अजूनही 20 ते 30 कामगार अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कटारीया यांच्या बायोमास कंपनीत इलेक्ट्रीक पॅनलमध्ये ब्लास्ट झाल्याने ही आग लागल्याचं सांगितलं जात आहे. या आगीत आगीत कंपनीचे कोट्यवधी रुपयांचं नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाकडून आग विझविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
कामगारांचा शोध सुरू
कटारिया ॲग्रो कंपनीत बायोमासपासून बॅलट बनविण्याचं काम होतं. या बायोमासलाच आग लागली. त्याशिवाय या कंपनीत भुसा मोठ्या प्रमाणावर असल्याने भुश्याने भराभर पेट घेतल्याने आग अधिकच भडकली. आग आणि धुराचे लोट संपूर्ण परिसरात पसरले. त्यामुळे सर्वांचीच भंबेरी उडाली. या कंपनीत एका ट्रकमधून बायोमास आणण्यात आले होते. हा ट्रक कंपनीच्या बाहेर उभा होता. हा ट्रकही या आगीत संपूर्ण जळून गेलाआहे. तसेच आगीत अनेक गाळे जळून खाक झाले आहेत. आगीत काहीच उरलेले नाही. या कंपनीत 20 ते 30 कामगार होते. त्यांनाही बाहेर काढता आलेलं नाही. अग्निशमन दलाचे जवान या कामगारांचा शोध घेत आहेत. तासाभरापासून हा शोध सुरू असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
शर्थीचे प्रयत्न सुरू
आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलासह पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेतली आहे. इतर अग्निशमन दलाच्या गाड्याही मागवण्यात येत आहे. आग लवकरात लवकर नियंत्रणात कशी येईल याचा प्रयत्न सुरू आहे. अग्निशमन दलाचे वरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी आल्याचं सांगितलं जातं. कंपनीच्या इलेक्ट्रिक पॅनलमध्ये ब्लास्ट झाल्याने आग लागल्याचं सांगितलं जात असलं तरी या आगीचं नेमकं कारण शोधण्यासाठी चौकशी करण्यात येणार आहे.