नागपुर कृषी उत्पन्न बाजार समित्यांचं गणित काय?, सुनील केदार यांच्या नेतृत्वात काँग्रेसने खाते उघडले,भाजपला दिला धक्का
नागपूर : नागपूर हा भाजपचा बालेकिल्ला समजला जातो. कारण भाजपचे प्रमुख नेते नागपुरात राहतात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे तिन्ही मोठे भाजपचे नेते नागपुरात राहतात. त्यामुळे नागपुरात भाजपची चलती असल्याचे समजले जाते. पण, ग्रामीण भागात काँग्रेसचे सुनील केदार हे जोमाने काम करतात. लोकांच्या समस्या जाणतात. त्या सोडवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे सुनील केदार गट ग्रामीण भागात चांगले काम करत असल्याचे दिसून येते. याचाच परिणाम म्हणून सावनेर येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत १८ पैकी १८ जागा बिनविरोध निवडून आणत काँग्रेसने सुनील केदार यांच्या नेतृत्वात खाते उघडले आहे.
सावनेरमधून खाते उघडले
नागपूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक जोरात होत आहे. विधानसभा, जिल्हा परिषद पंचायत समितीच्या दृष्टीकोणातून कृषी उत्पन्न बाजार समित्या आपल्या ताब्यात असाव्या, असा प्रमुख पक्षांचा प्रयत्न असतो. पण, सध्या नागपुरात कृषी उत्पन्न बाजार समितीत सुनील केदार यांनी सावनेरमधून खाते उघडले आहे.
भाजपला दिला धक्का
काँग्रेस नेते आणि आमदार सुनील केदार यांनी आपल्या सावनेरची निवडणूक बिनविरोध करत विजय मिळवला. नागपूर जिल्ह्यातील 7 तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुका होणार आहे. त्यापूर्वीच काँग्रेस नेते आणि आमदार सुनील केदार यांनी आपल्या सावनेर तालुक्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक बिनविरोध करत भाजपला धक्का दिला आहे.
उमरेडमध्ये पारवे विरुद्ध पारवे
सावनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या 18 पैकी 18 जागा केदार गटाने बिनविरोध जिंकल्या आहेत. यापूर्वी सुद्धा सावनेर बाजार समितीवर केदार गटाचे वर्चस्व होते. ते कायम ठेवण्यात त्यांना यावेळी सुद्धा यश आले आहे.
उमरेड, भिवापूर आणि कुही या बाजार समित्यांमध्ये काँग्रेसचे आमदार राजू पारवे आणि भाजपचे माजी आमदार सुधीर पारवे यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्यावेळी भाजपने सुधीर पारवे यांच्या नेतृत्वात उमरेड बाजार समिती जिंकली होती.
यावेळी आमदार राजू पारवे यांनी सूत्र हाती घेतली आहेत. गेल्या वेळी कुही-मांढळ आणि भिवापूरमध्ये काँग्रेसने सभापती बसवले होते. पण, यावेळी स्पष्ट बहुमत नव्हते. यावेळी काय होते, याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहे.
नागपूर जिल्ह्यात होणाऱ्या बाजार समिती निवडणूक
1) सावनेर-बिनविरोध – केदार गट
2) रामटेक- 28 एप्रिल मतदान आणि 29 एप्रिल मतमोजणी
3) कुही- मांढळ- 28 एप्रिल मतदान आणि 29 एप्रिल मतमोजणी
4) पारशिवनी- 28 एप्रिल मतदान आणि 29 एप्रिल मतमोजणी
5) भिवापूर- 13 मे मतदान आणि 14 मे मतमोजणी
6) उमरेड- 13 मे मतदान आणि 14 मे मतमोजणी
7) मौदा- 30 एप्रिल मतदान आणि त्याच दिवशी मतमोजणी