कांदा अनुदान लाटण्यासाठी APMCचे अधिकारी व व्यापाऱ्यांनी पैसे घेऊन बनावट पावत्या केल्या तयार
नाशिक : लेट खरीप कांद्याच्या (Kharip onion) दरात मोठी घसरण झाल्यानंतर राज्य सरकारने प्रतिक्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याची घोषणा केली.
मात्र यामध्ये काळाबाजार होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या (Market commettee)आणि खरेदीदार व्यापाऱ्यांनी कांदा अनुदान लाटण्यासाठी टक्केवारीनुसार बनावट नोंद करून पावत्या तयार केल्या आहेत.याची सखोल चौकशी करून दोषी बाजार समित्या व व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी विठेवाडी   येथील शेतकरी सुनील सोनवणे यांनी   जिल्हाधिकाऱ्यांकडे केली.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर   सोनवणे हे उपोषणाला बसले होते. मात्र मुख्यमंत्र्यांचा दौरा असल्याने हे उपोषण मागे घेत जिल्हा प्रशासनाकडे निवेदन सादर केले.त्यात त्यांनी नमूद केल्यानुसार, जिल्ह्यात कांदा आवक होणाऱ्या बाजार समित्या व व्यापाऱ्यांनी संगनमताने कांदा अनुदान लाटण्यासाठी बनावट व्यवहार दाखवून गैरप्रकार केला आहे.अनुदानाचे लाभार्थी होण्यासाठी पैसे घेऊन बनावट पावत्या तयार करून दिलेल्या आहेत. अशा व्यापाऱ्यांची चौकशी करावी.
कांदा खरेदीच्या बनावट पावत्या तयार केलेल्या दिवसाचे व्यापारी वर्गाचे बँकखाते तपासावे, खरेदी केलेला कांदा यांनी कुठे दिला, याची चौकशी व्हावी, अशी मागणी सोनवणे यांनी केली आहे.
‘फौजदारी गुन्हे दाखल करा’
‘‘खरोखर ज्या शेतकऱ्यांनी कांदा विकला आहे, त्यांचे व्यापाऱ्यांनी केलेल्या गैरप्रकारामुळे नुकसान होऊ नये, एवढीच अपेक्षा आहे.चौकशीत दोषी आढळणाऱ्या व्यापाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. त्यामुळे असे गैरप्रकार पुढील काळात घडणार नाहीत,’’ असे सोनवणे यांनी सांगितले.