कांद्याला भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन
नाशिक: कांद्याला अपेक्षित भाव न मिळाल्याने, शिवाय आवक वाढली की भाव गडगडत असल्याने संतप्त शेतकऱ्यांनी दहिवेल   येथे रास्ता रोको आंदोलन केले. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतरही शेतकरी माघार घेण्यास तयार नव्हते. शेवटी पोलिसी खाक्यानंतर शेतकऱ्यांनी कांद्याला अपेक्षित भाव मिळावा, अशी मागणी करत वाहतूक सुरळीत होण्यासाठी सहकार्य केले. पिंपळनेर   येथील बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी ३०० ते ११०० रुपयांचा दर मिळत आहे. याउलट दहिवेल येथील सोमेश्वर कृषी मार्केटमध्ये सरासरी प्रतिक्विंटल सातशेपेक्षा अधिक दर दिला जात नाही.
शिवाय कांद्याची आवक वाढली तर सरासरी दोनशे, तीनशे, चारशे रुपये प्रतिक्विंटल दर दिला जातो म्हणजेच दर गडगडत असल्याने संतप्त शेतकरी आंदोलनावर उतरले. त्यांनी रास्ता रोको आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले.कष्टाने पीक घेऊनही शेतकऱ्याची आर्थिक पिळवणूक केली जाते. कांद्याला चांगला भाव दिला नाही तर पुन्हा मोठ्या संख्येने तीव्र आंदोलन केले जाईल.
पिंपळगाव येथे प्रतिकिलो १५ ते १६ रुपयांनी कांदे विक्री होतात. दहिवेल येथील सोमेश्वर कृषी मार्केट येथे कमीत कमी १०० वाहनांचा लिलाव झालेला होता. मात्र, एकाही वाहनाला सात रुपयांवर भाव दिला गेला नाही. इतर मार्केटपेक्षा दहिवेल येथे निम्मा भाव दिला जात असल्याने शेतकरी संतप्त झाले व त्यांना आंदोलन करावे लागले.