हमीभावाने तूर खरेदीच्या ऑनलाईन नोंदणीसाठी 30 दिवसांची मुदतवाढ-पणन मंत्री जयकुमार रावल

तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा
मुंबई: हंगाम 2024-25 मधील हमीभावाने तूर खरेदीसाठी दिनांक 24 जानेवारी 2025 पासून पुढे 30 दिवसांपर्यंत शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणीबाबत कळविण्यात आले होते.तूर उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता हमी भावाने तूर खरेदीच्या नोंदणीची मुदत आणखी 30 दिवस वाढविण्यात येत असल्याची माहिती राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी दिली. दिनांक 24 फेब्रुवारी 2025 अखेर राज्यात 29 हजार 254 शेतकऱ्यांची नोंदणी झाली असून 161 शेतकऱ्यांकडून 1813.86 क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे.आज तूर खरेदी नोंदणीची मुदत संपली होती.अजून अधिक शेतकऱ्यांना हमी भाव तूर खरेदीत नोंदणी करता यावी, यादृष्टीने ही मुदतवाढ देण्यात आली आहे.
तूर खरेदीसाठी राज्यभरात जवळपास नाफेड चे 373 व एनसीसीएफ 125 असे एकूण 498 केंद्र सुरू झाले आहेत. खरेदी केल्यानंतर साधारणतः दोन ते तीन दिवसांत शेतकऱ्यांना त्याचे पैसे मिळण्याची प्रक्रिया जलदगतीने करण्याच्या संदर्भात निर्देश दिले असल्याचे ही त्यांनी सांगितले.
तसेच, नोंदणी प्रक्रियेत तांत्रिक अडचण येणार नाही याची काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. 'नाफेड' अंतर्गत महाराष्ट्र मार्केटींग फेडरेशन, तसेच विदर्भ मार्केटींग फेडरेशन या दोन संस्थांच्या माध्यमातून तूर खरेदी प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. त्याठिकाणी डेटा एन्ट्री व्यवस्था शेतकऱ्यांच्या प्रतिसादानुसार आवश्यक प्रमाणात ठेवण्यात येणार आहे.