केळीच्या दराला पुन्हा उभारी; क्विंटलमागे तब्बल ४०० रुपयांची वाढ

भावकपातीने हवालदिल शेतकऱ्यांना दिलासा सीसीटीव्ही व थेट प्रसारणाद्वारे लिलाव प्रक्रियेवर नजर
जळगाव :
गेल्या आठवड्यात केळीचे दर घसरून तब्बल १२०० रुपयांपर्यंत आल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला होता. मात्र, पावसाचा जोर ओसरल्याने व नवरात्रोत्सव जवळ आल्याने अखेर केळीच्या दरात सुधारणा दिसून आली असून, प्रतिक्विंटल तब्बल ४०० रुपयांची वाढ झाली आहे.
१२ ऑगस्टपर्यंत बऱ्हाणपूर बाजार समितीत केळीला १८२५ रुपयांचा दर मिळत होता. पण त्यानंतर व्यापाऱ्यांच्या संगनमताने भाव पाडण्यास सुरुवात झाली. कधी १५००, कधी १३००, तर कधी १२०० रुपये असा मनमानी दर आकारून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान करण्यात आले. केळीच्या काढणीतही मुद्दाम टाळाटाळ करून शेतकऱ्यांना अडचणीत आणण्यात आले.
या सर्व प्रकारामुळे शेतकऱ्यांत तीव्र नाराजी पसरली होती. मात्र, कोणताही लोकप्रतिनिधी पुढे न आल्याने शेतकरी अधिकच हतबल झाले. बऱ्हाणपूर जिल्हाधिकारी हर्ष सिंग यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला. यावेळी केळी लिलाव प्रक्रियेवर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर ठेवणे, लिलाव यूट्यूब लिंकवर थेट दाखविणे, बाजारभाव जाहीर करताना किमान २० भावांची सरासरी घेणे व बाजार समितीबाहेरील अनधिकृत खरेदीवर चेकपोस्ट उभारणे यावर निर्णय घेण्यात आला. मात्र, या निर्णयांची प्रत्यक्ष अंमलबजावणी तातडीने सुरू होणे आवश्यक असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.