पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जाताना एकाच कुटुंबातील 5 जण ठार
 
 
पंढरपूर येथे देवदर्शनासाठी जाताना एकाच कुटुंबातील 5 जण ठार झाले. सर्व मृत आणि जखमी राधानगरी तालुक्यातील सरवडे येथील आहेत. मिरजेतील बायपास मार्गावर बोलेरो आणि विटाने भरलेल्या ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली. बुधवारी अकराच्या सुमारास ही घटना घडली.
मृतांमध्ये एका चालकासह सोहम पवार (वय १२), जयवंत पवार, (वय ४५) , कोमल शिंदे (वय ६०), लखन शिंदे (वय ६०) यांचा समावेश आहे.
जयवंत पवार कुटूंबासह पंढरपूरला देवदर्शनासाठी जात होते. मात्र राजीवगांधीनगर येथे रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर भरधाव बोलेरो आणि विटाने भरलेला ट्रॅक्टर यांची समोरासमोर धडक झाली. बोलेरोमध्ये सात जण असल्याची माहिती मिळत आहे. त्यातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. जखमींना मिरजेच्या शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले आहे.
रत्नागिरी-नागपूर या रस्त्याचा मिरजेतील बायपास रस्ता दोन दिवसापूर्वी सुरु झाला आहे. या रस्त्यावर राजीव गांधीनगर या ठिकाणी विटांनी भरलेल्या ट्रॅक्टरने बोलोरेला (क्र. एमएच 09 डी ए 4912) जोरदार धडक दिली. या धडकेत बोलेरोतील तीन पुरुष एक महिला व एका बारा वर्षाच्या मुलाच्या जागीच मृत्यू झाला आहे. तर या अपघातात तीन जण जखमी झाले असून एका जखमी महिलेची स्थिती गंभीर आहे. याबाबतची नातेवाईकांना माहिती मिळतात तात्काळ मिरजेला रवाना झाले आहेत. जखमी तिघांच्या वर मिरज शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.
अपघातस्थळी पोलीस अधीक्षक बसवराज तेली, पोलीस उपाधीक्षक अजित टिके, ग्रामीणचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख, महात्मा गांधी चौकीचे भालेराव यांच्यासह पोलिस अधिकारी व कर्मचारी दाखल झाले आहेत.