शेतकऱ्यांच्या नावाने तब्बल 8000 कोटींचा घोटाळा? उद्धव ठाकरे यांचा धक्कादायक दावा
 
Uddhav Thackeray :हिंगोलीच्या कर्जबाजारी शेतकऱ्यांनी आपलं स्वत:च्या शरीराचे अवयव विक्रीला काढले. त्यांनी आपली किडनी, लिव्हर, डोळे विकण्याचा निर्णय घेतला. सरकारने आपले अवयव विकत घेऊन कर्जमाफी करावी, अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली. हे शेतकरी मुंबईत आले आहेत. त्यांना काल पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर या शेतकऱ्यांनी आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर पीक विमा योजनेच्या माध्यमातून तब्बल 8000 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याची आपल्याला शंका असल्याचा खळबळजनक दावा केलाय. त्यांच्या या आरोपांवर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय प्रतिक्रिया देतात ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.
आपली खरंतर प्रेस कॉन्फरन्स ठरलेली नव्हती. पण काल शेतकरी ‘मातोश्री’वर येऊन गेले. त्यांना खासदार विनायक राऊत भेटले. त्यानंतर आपण त्यांना आपल्या विरोधी पक्षनेत्यांकडे पाठवलं होतं. संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचा होता. पण अचानक मला टीव्हीवर बातमी दिसली आणि कानावर आलं की, या सर्व शेतकऱ्यांना अटक करण्यात आली”, असं उद्धव ठाकरे सुरुवातीला म्हणाले.
“खासदार अरविंद सावंत, आमचे विभागप्रमुख संतोष शिंदे यांना मी सांगितलं की, यांना शोधा कुठे गेले, कारण कुणालाच काही कळालं नाही. त्यानंतर माहिती मिळाली की, त्यांना आझाद मैदान पोलीस ठाण्यात नेण्यात आलंय. त्यांचा गुन्हा काय होता? काय म्हणून पोलिसांनी त्यांना अटक केली? शेतकऱ्यांनी आजची परिस्थिती सांगितली, ही शेतकऱ्यांची खरी परिस्थिती आहे”, असं ठाकरे म्हणाले.
ठाकरेंकडून पुन्हा ‘नालायक’ शब्दाचा पुनरुच्चार
“मी गेल्या आठवड्यात पत्रकार परिषद घेतली होती. त्यावेळी राज्यात अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली होती. त्यावेळी आपले मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री राज्यात नव्हते. मी बोलताना बोलून गेलो, स्वत:च्या राज्यातील शेतकऱ्यांची घरे उद्ध्वस्त असताना दुसऱ्यांच्या घरात दुसऱ्याची धुणीभांडी करायला जाणारी लोकं हे राज्यकारभार करायला नालायक आहे. तो शब्द त्यांना लागला. त्यावरुन त्यांना काय करायचं ते करावं. पण मी नागरिकांना विचारतो की, या शेतकऱ्यांवर अवयव विक्री करण्यापर्यंतची वेळ आली मग राज्यकारभार करणाऱ्यांना बोलायचं काय?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
“गेल्या दोन-तीन दिवसांत विनायक राऊत, अंबादास दानवे, सुषमा अंधारे शेतकऱ्यांच्या बांधावर गेले आहेत. सगळीकडे मोर्चे निघत आहेत. जिल्ह्याधिकाऱ्यांना विचारणा होतेय. मी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाप्रमुख आणि पदाधिकाऱ्यांना सांगतोय, जिथे शेतकऱ्यांचं नुकसान झालंय तिथे सर्वांनी कलेक्टर कार्यालयावर मोर्चे घेऊन जा, त्यांना विचारा, काल-परवाचे पंचनामे सोडा, त्याआधी झालेल्या नैसर्गिक आपत्तीचे पंचनामे केले का? त्याची परतफेड कधी मिळेल?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.
पीक विम्याचा पैसा कोणाच्या खिशात गेला?
“पीकविमा योजना हा मोठा घोटाळा आहे का? अशी शंका मला येऊ लागली आहे. कारण एक रुपयात पीक विमान मिळणार म्हणून पावणे दोन कोटी शेतकऱ्यांनी अर्ज भरलाय. तसेच शेतकऱ्यांच्या नावाने राज्य सरकारने पीक 8 हजार कोटी रुपये विम्याच्या बोडक्यावर घातले आहेत. एवढं करुन विमा कंपन्यांचे कार्यालय बंद आहेत. त्यांच्याकडे कोणी फोन घेत नाही, कुणी कुणाला दाद देत नाहीत. ते सरकारचं ऐकत नाही आणि शेतकऱ्यांना सामोरे जात नाहीत. त्यामुळे हा पैसा त्या कंपन्यांच्या नावाने कोणाच्या खिशात गेला त्याचा शोध घेतला पाहिजे. कारण हा पैसा करदात्यांचा पैसा आहे. शेतकऱ्यांना किती पैशांचे मदत मिळाले पाहिजेत आणि किती रुपयांचे चेक मिळत आहेत ते बघायला पाहिजे”, असं उद्धव ठाकरे म्हणाले.