निवडणुकीसाठी पालिका सज्ज 9.5 लाख मतदार 1141 मतदान केंद्र 6275 कर्मचाऱ्यांची नियुक्ती
चार सदस्यीय प्रभाग पद्धतीत पहिल्यांदाच नवी मुंबई पालिका निवडणूक सायबर सेलची करडी नजर
नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता, पारदर्शकता आणि कायदा-सुव्यवस्था राखत शांततेत निवडणुका पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा पूर्णतः सज्ज झाली आहे. यंदा पहिल्यांदाच चार सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक होणार असून १११ प्रभागांऐवजी २८ प्रभागांची रचना करण्यात आली आहे.
पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी पत्रकार परिषदेत निवडणूक प्रक्रियेची तयारी, प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱ्या उपाययोजना आणि कार्यवाहीची सविस्तर माहिती दिली. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार नवी मुंबईतही निवडणूक प्रक्रिया पार पडणार असून उमेदवारांसह मतदारांनी नियमांचे पालन करून मोठ्या संख्येने मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले.
महापालिका क्षेत्रात एकूण ९ लाख ४८ हजार ४६० मतदार असून यामध्ये ५ लाख १६ हजार २६७ पुरुष, ४ लाख ३२ हजार ०४० महिला व १५३ इतर मतदारांचा समावेश आहे. प्रभाग क्रमांक १ मध्ये सर्वाधिक ४० हजार १९८ मतदार तर प्रभाग क्रमांक २८ मध्ये सर्वात कमी २६ हजार ७९८ मतदार आहेत. अंतिम मतदार यादी जाहीर झाली असून त्यात ४५ हजार १५५ दुबार नावे आढळून आली आहेत.
एकूण २८ प्रभागांपैकी २७ प्रभागात चार सदस्यीय तर एका प्रभागात त्रिसदस्यीय निवडणूक होणार आहे. १५ जानेवारी रोजी मतदान होणार असून त्यासाठी १,१४१ मतदान केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर ७०० ते ८०० मतदार मतदान करतील. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक राहावी यासाठी ८ निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नवी मुंबई महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या १४ गावांतील सुमारे १५ हजार मतदारही या निवडणुकीत मतदान करणार आहेत. त्यांच्यासाठी सुमारे १,५०० मतदान केंद्रांचे नियोजन करण्यात येणार आहे.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ५,६०० प्रत्यक्ष आणि राखीव धरून एकूण ६,२७५ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली असून रायगड जिल्ह्यातील कर्मचाऱ्यांचेही सहाय्य घेण्यात येणार आहे. प्रत्येक उमेदवाराला ११ लाख रुपयांपर्यंत निवडणूक खर्चाची परवानगी देण्यात आली आहे.
प्रचारादरम्यान आचारसंहितेचा भंग रोखण्यासाठी पालिका व पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने स्थापन करण्यात आलेल्या सायबर सेलची सोशल मीडियावर करडी नजर राहणार आहे. चार स्थिर पथके आणि भरारी पथकांद्वारे देखरेख करण्यात येणार असून उल्लंघन आढळल्यास तात्काळ कारवाई केली जाईल. तंत्रज्ञानाच्या वापरावर भर देत ऑडिओ माध्यमातून चार सदस्यीय प्रभागात मतदान कसे करावे, याबाबत जनजागृतीही करण्यात येणार आहे. निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व प्रक्रिया काटेकोरपणे राबविण्यात येतील, असे आयुक्त डॉ. शिंदे यांनी स्पष्ट केले.