कोट्यावधीचे बोगस पीक विमा प्रकरणी धाराशिव येथे 24 जणांवर गुन्हा दाखल
आर्थिक गुन्हे शाखा करणार प्रकरणाचा तपास
धाराशिव: धाराशिव जिल्ह्यात कोट्यावधीचे बोगस पीक विमा प्रकरण उघड झाले असुन 24 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे. बीड, अंबेजोगाई, परभणी, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर व धाराशिव येथील काही शेतकरी यांच्यासह ऑनलाईन सेवा केंद्र चालकावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी चौकशी आदेश दिल्यानंतर घोटाळा उघड होऊन कृषी विभागाने दिलेल्या तक्रारीनुसार गुन्हा नोंद झाला आहे. राज्यभर या पीक विमा घोटाळ्याचे धागेदोरे असल्याने या प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.धाराशिव जिल्ह्यातील शासकीय 2 हजार 994 हेक्टर शेत जमीन स्वतःची आहे असे दाखवून ऑनलाईन पीक विमा काढला या शेतकऱ्यांनी पीक विमा भरल्याने सरकारने 3 कोटी 13 लाख रुपयांचा त्यांचा वाटा हिस्सा म्हणून पीक विमा हप्ता भरला त्यामुळे सरकारची फसवणूक झाली. जिल्हा कृषी अधीक्षक रवींद्र माने व त्यांच्या टीमने या प्रकरणाची चौकशी केली त्यानंतर कृषी उप संचालक बाबासाहेब वीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला.