कर्जबाजारी वृद्ध शेतकऱ्याने संपवले जीवन
जळगाव- तालुक्यातील पाथरी गावातील ६५ वर्षीय वृध्द शेतक-्याने
कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतातील झाडाला गळफास घेवून जीवन संपवले. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोद करण्यात आली आहे.
या बाबत अधिक असे की, तालुक्यातील पाथरी येथे भागवत दगडू पाटील (वय ६५) हे राहतात. त्यांची गावालगतच भावासोबत सामाईक शेती आहे. शेती करुन ते कुटुंबाचा उदनिर्वाह करीत होते. शेतीसाठी त्यांनी हातउसनवारीने पैसे घेतले होते, त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ते चिंतेत होते. दरम्यान, ३ मार्च रोजी दुपारच्या सुमारास ते आपल्यात शेतात गेले. काही वेळ त्याठिकाणी थांबल्यानंतर ते त्यालाच लागून असलेल्या भावाच्या शेतातमध्ये गेले, याठिकाणी कडूलिंबाच्या झाडाला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन भागवत पाटील यांनी आत्महत्या केली. सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास शेतात काम करीत असलेल्या भागवत पाटील यांचा पुतण्या झाडाजवळ आला असता, त्याला काकांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. यावेळी त्यांच्या कुटुंबियांनी आक्रोश केला. घटनेची माहिती पोलीस पाटील संजीव लंगरे यांनी एमआयडीसी पोलिसांना दिली. त्यानुसार पोलीस कर्मचारी हेमंत पाटील व प्रदिप पाटील यांनी लागलीच त्याठिकाणी धाव घेत पंचनामा केला.