मोठ्या संख्येने पशुधन बाजारात चार्यापाण्याच्या प्रश्नापुढे शेतकरी हतबल
 
एपीएमसी न्यूज डेस्क : यंदा पावसाने पाठ फिरविल्याने साठवण तलावातील तसेच विहिरींमधील जलसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. आजघडीला थोड्याफार प्रमाणात पाणीसाठा शिल्लक असल्यामुळे जनावरांच्या पाण्याची सोय आहे. मात्र, एप्रिल आणि मे महिन्यामध्ये जनावरांना हिरवा चारा आणि पाणी मिळणे कठीण होणार आहे. या भीतीने पशुपालक जनावरांची मिळेल त्या भावात विक्री करीत आहेत.
मराठवाडा आणि उन्हाचा पारा हे जन्मोजन्मीच सूत्र आहे. अलीकडे दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत आहे. याचा परिणाम मानवी जीवनासह जनावरांच्या बाजारावर होत आहे. चाराटंचाई, पाणीटंचाईचे संकट थोड्याच दिवसांनी सर्वत्र दिसणार आहे. त्यामुळे पशुपालकांना जनावरे सांभाळणे कठीण होणार आहे.
बीड जिल्ह्याच्या देवणी बाजार मध्ये दीड ते दोन लाखाची बैलजोडी बळीराजाला नाइलाजाने अगदी एका लाखात विकावी लागत आहे. तर लाखाच्या पुढे विकली जाणारी म्हैस देखील ८० हजार रुपयांपर्यंत विकली जात असल्याचे पशुपालक सांगतात.उन्हात काम करण्याची क्षमता अधिक असल्याने बाजारात गावरान बैलजोडीला चांगली मागणी असते. रंग व तेज पाहून भाव ठरवले जात असले, तरी गावरान बैलजोडी एक लाख रुपयांमध्ये विकली जाते.
म्हशीच्या किमती ८० हजारांवर
सध्या जनावरांच्या बाजारात म्हणा किवा शेतकऱ्याच्या दावणीला कुठेही म्हैस असले तर तिला चांगली मागणी आहे. आजघडीला म्हशीला ८० हजार ते १ लाख रुपये भाव आहे. जो इतर जनावरांच्या तुलनेत अध्याप काहीसा टिकून आहे.
खिलार जोडी मिळतेय सव्वालाखात
पांढरा शुभ्र रंग, उंच शिंगे, डोलदार चपळ शरीर आदींमुळे खिलार जातीच्या बैलजोडीलादेखील चांगली मागणी असते. ग्रामीण भागासह शहरात खिलार बैलजोडी प्रसिद्ध आहे. ही जोडी सध्या सव्वालाखाच्या पुढे जाते आहे.
ग्रामीण भागात देशी गाय मिळेना
शेतकरी दुग्धव्यवसायाकडे वळाल्याने प्रत्येकाच्या दावणीला विदेशी गायी दिसून येतात. देशी गाई तुरळक ठिकाणी दिसून येते. चारा-पाण्याचा खर्च व उत्पन्न कमी असल्यामुळे देशी गायी कोणी संभाळत नाहीत. त्यामुळे देशी गायींची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे.
चाराटंचाईमुळे भाव झाले कमी
पावसाने हुलकावणी दिल्याने मुबलक पाणीसाठा नाही. परिणामी वाळलेला व हिरवा चारा मिळणे कठीण कठीण झाले आहे. जनावरांना चारा पाण्याची टंचाई जाणवत असल्याने जनावरांचे भाव कमी झाल्याचे आठवडी बाजारात दिसून येत आहे.
चोरटी बैलजोडीला सत्तर हजारांचा भाव
आठवडी बाजारासह शेतकऱ्याच्या दावणीला असलेल्या चोरटी जातीच्या बैलजोडीला म्हणावा तसा भाव भेटत नाही. ही जोडी साधारण ७० ते ८० हजारांच्या दरात असते.
व्यापारी / शेतकरी म्हणतात ....
काही वर्षापूर्वी जनावराला चांगले भाव असायचे. आठवडी बाजारात नजर थांबणार नाही, अशी जनावरं असायची. दिवसेंदिवस जनावरांची संख्या घटू लागल्याने खरेदी-विक्री कमी पैशात होऊ लागली आहे. - संजय सपुत्रे, व्यापारी
भविष्यात चारा, पाण्याची टंचाई येणार असल्यामुळे लाखाची जनावरे २५ ते ३० हजार रुपयांत द्यावी लागत आहेत. चारा- पाण्याविना हंबरडा फोडत बसण्यापेक्षा जनावर विकून मोकळ झालेलं केव्हाही चांगले. - अन्सारभाई शेख, शेतकरी