एक व्हॉट्सॲप कॉल अन कोट्यवधी रुपये गायब, मुंबईत डिजिटल अरेस्टचा धक्कादायक प्रकार
मुंबई : डिजिटल अरेस्टचा एक धक्कादायक प्रकार मुंबईतून समोर आला आहे. मुंबईतील एका 77 वर्षीय वृद्ध महिलेची सायबर गुन्हेगारांनी 3.8 कोटींची फसवणूक केली आहे. आरोपींनी महिलेच्या बँक अकाऊंटमधील पैसे ट्रान्सफर करुन घेतले. फसवणूक झालेली महिला दक्षिण मुंबईत त्यांच्या निवृत्ती पतीसोबत राहते. तर त्यांची मुले परदेशात वास्तव्यास आहेत.
पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, महिलेला व्हॉट्सअॅपवरुन एक कॉल आला होता. कॉलवर बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितलं की, त्यांनी तैवानला पाठवलेलं पार्सल थांबवण्यात आलं आहे. यामध्ये पाच पासपोर्ट, एक बँक कार्ड, 4 किलो कपडे आणि ड्रग्स सापडले आहेत. मात्र महिलेने सांगितलं की मी कोणतंही पार्सल पाठवलेले नाही. यावर आरोपींनी सांगितलं की तुमचं आधारकार्ड पार्सलसोबत लिंक आहे. मुंबई पोलिसांचे वरिष्ठ अधिकारी याबाबत तुमच्याशी बोलतील.
महिलेने आरोप फेटाळल्यानंतर पोलिसांनी त्यांना स्काईप अॅप डाऊनलोड करण्यास सांगितलं. त्यानंतर IPS अधिकारी अनंत राणा या नावाने आरोपीने महिलेशी संवाद साधला. महिलेकडून सर्व बँक डिटेल्स मागितल्या. बँकेतील सर्व पैसे ट्रान्सफर करण्यास सांगितले आणि चौकशी केल्यानंतर पैसे पुन्हा पाठवले जातील असंही सांगितलं.
आरोपींनी महिलेला क्राईम ब्रांचचं नकली नोटीस देखील पाठवलं. या सर्व प्रक्रियेदरम्यान महिलेला 24 तास व्हिडीओ कॉल सुरु ठेवण्यास या आरोपींनी सांगितलं. व्हिडीओ कॉल कट झाल्यानंतर आरोपी पुन्हा त्यांना फोन करत असे. महिलेने बँकेत जाऊन आधी 15 लाख रुपये आरोपींनी सांगिलेल्या बँक अकाऊंटमध्ये पाठवले. आरोपींनी ते पैसे पुन्हा पाठवले आणि सर्व तपशील योग्य असल्याचे सांगितले.
महिलेचा विश्वास जिकल्यानंतर आरोपींनी टप्प्याटप्प्यात 3.8 कोटी रुपये आपल्या अकाऊंटमध्ये ट्रान्सफर करुन घेतले. मात्र आरोपींनी ते पैसे परत न केल्याने महिलेला संशय आहे. याबाबत महिलेना पोलिसांत तक्रार दाखल केली. पोलिसांना गुन्हा दाखल केला असून चौकशी सुरु आहे.