शेतकऱ्याच्या शेतमालाची पैसे दिले नाही तर व्यापाऱ्यांवर होणार कारवाई-पणन संचालक
पुणे : शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे पैसे लगेच देणं व्यापाऱ्यांना बंधनकारक आहे. परंतु व्यापारी शेतकऱ्यांचा माल खरेदी करूनही तातडीनं पैसे देत नसतील, तर संबंधित व्यापाऱ्यावर कारवाई करण्याचे आदेश राज्याचे पणन संचालक शैलेश कोतमिरे यांनी दिले आहेत. त्यामुळे यापुढे शेतकऱ्यांच्या मालाचे पैसे देण्यास व्यापाऱ्यांनी उशीर केला तर पणन संचनालय कारवाईचा दणका देणार आहे.
राज्यातील शेतकऱ्यांकडून बाजार समिती व्यापाऱ्याला शेतीमाल विकतात. परंतु व्यापारी पैसे देण्यास उशीर करतात. आता मात्र शेतमाल खरेदी केल्यानंतर वजन होताच, शेतकऱ्यांचे पैसे लगेच देणं व्यापाऱ्यांना बंधनकारक करण्याचा आदेश पणन संचालकाकडून देण्यात आला आहे.
शेतमाल विक्रीनंतर व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांना त्याच दिवशी पैसे दिले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची अडचण होते. पैसे उशिरा देणाऱ्या व्यापाऱ्यांच्या तक्रारी पणन संचालनालयाला मिळल्या आहेत. शेतकऱ्यांची फसवणूक व्यापाऱ्यांकडून केली जाते.
आधीच शेतकऱ्यांच्या शेतमालाला दर मिळत नाहीत. त्यात शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांकडून फसवणूक केली जाते. त्यामुळे विषयाचं गांभीर्य ओळखून पणन संचालकांनी कारवाईचे आदेश दिलेत.
शेतकऱ्यांचा माल खरेदी केल्यानंतर व्यापाऱ्यांनी पैसे दिले नाहीत, तर अधिकाऱ्यांकडून बाजारातील व्यापाऱ्यांच्या हिशोब वहीची तपासणी केली जाणार आहे. तसेच शेतकऱ्यांना व्यापाऱ्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली तर व्यापाऱ्यांच्या बँकेतील अनामत रक्कमेतून (डीपॉझीट) मधून पैसे देण्यात येणार आहेत. किंवा ज्या बँकेने व्यापाऱ्याची हमी दिली अशा बँकेकडून शेतकऱ्यांना देण्याची कायद्यात तरतूद आहे.
पणन संचालकांच्या आदेशानुसार बाजार समितीत शेतमालाचे लिलाव झाल्यास बाजार समितीनं देखील व्यापाऱ्यांच्या खरेदी-विक्रीसह विक्री दराची माहिती घेणं गरजेचं असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. तसेच ज्या व्यापाऱ्यांनी नियमांचं पालन केलं नसेल तर त्यावर कारवाई करण्याचा उल्लेख आहे.
सहकारी संस्थांच्या जिल्हा निबंधक तसेच सहायक निबंधकांनी त्यांच्या बाजार समित्यांना भेटी द्याव्यात. तसेच बाजार समितीतील शेतीमालाच्या खरेदी-विक्रीचा आढावा घेण्याचे आदेश दिले आहेत. परिपत्रकाचे पालन होते की नाही याची खात्री करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.