कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील आत्महत्या प्रकरणात अजितदादांचा पलटवार, आम्ही जबाबदार नाही, सब-कॉन्ट्रॅक्टरचा आमच्याशी संबंध नाही

“मुख्य कंत्राटदाराला दिलं होतं काम, सब-कॉन्ट्रॅक्टरची जबाबदारी आमची नाही – अजित पवारांचा खुलासा”
एपीएमसी न्यूज़ डेस्क : काम केल्यानंतरही बिलाचे पैसे न मिळाल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या कॉन्ट्रॅक्टर हर्षल पाटील यांनी आत्महत्या केल्याने राज्यभरात खळबळ उडाली आहे. यामुळे शासनाच्या यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात असताना, आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी याबाबत आज नवी माहिती दिली असून, सरकारचा या आत्महत्येशी थेट संबंध नसल्याचा दावा त्यांनी केला आहे.
“पाटील हे सब-कॉन्ट्रॅक्टर होते. मुख्य कंत्राट सरकारकडून दुसऱ्या ठेकेदाराला दिलं गेलं होतं. आमचा संबंध मुख्य कंत्राटदाराशी होता, सब-कॉन्ट्रॅक्टरला आम्ही थेट पैसे देऊ शकत नाही,” असं स्पष्टीकरण अजित पवार यांनी दिलं.ते पुढे म्हणाले की,
“आज सकाळी 10 वाजता झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात आला. फायनान्स, प्लॅनिंग आणि संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्या बैठकीत मला मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कामाचे कंत्राट दुसऱ्या ठेकेदाराकडे होते आणि त्याने हर्षल पाटील यांना सब-कॉन्ट्रॅक्टर म्हणून नेमलं होतं.”
अजित पवार यांनी यावेळी माध्यमांना सुनावत म्हणाले,
“ब्रेकिंग न्यूज करणं तुमचा अधिकार आहे, पण दुसरी बाजूही समजून घेतली पाहिजे. सब-कॉन्ट्रॅक्टरचं सरकारशी थेट कोणतंही देणंघेणं नसतं. मुख्य कंत्राटदार आणि सब-कॉन्ट्रॅक्टर यांच्यातील व्यवहार आमच्या माहितीबाहेरचे असतात.”
ते पुढे म्हणाले,
“ही योजना ‘जल जीवन मिशन’अंतर्गत येते, ज्यामध्ये ५०% निधी केंद्र सरकारचा आणि ५०% राज्य सरकारचा असतो. पैसे टप्प्याटप्प्याने मिळतात आणि त्यानुसारच कामासाठी निधी वितरित केला जातो.”
दरम्यान, अजित पवार यांनी हेही स्पष्ट केलं की, “एखाद्या व्यक्तीने आत्महत्या केली म्हणजे यामागे फक्त एकच कारण असेल, असं समजणं योग्य नाही. पोलीस तपास सुरू आहे, आणि तो पूर्ण होईपर्यंत कोणतेही निष्कर्ष काढणे गैर आहे.”
राजकीय वर्तुळात मात्र या खुलाशावरही प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. विरोधकांनी न्यायालयीन चौकशीची मागणी करताना, सरकारच्या पळवाटीपणावर जोरदार हल्ला चढवला आहे. आता या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.