तुझ्या बापाचं कृषी मार्केट आहे का? DCM अजित पवारांकडून APMCच्या चेअरमन व सचिवांची कानउघडणी
.jpeg)
बारामती एपीएमसी न्यूज नेटवर्क: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी रविवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (APMC) वार्षिक सर्वसाधारण सभेला उपस्थित राहत समितीच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. गैरव्यवहार, भ्रष्टाचार आणि कामातील कच्चेपणा यावर त्यांनी व्यवस्थापनाला फटकारले. “मी आणलेल्या निधीचा गैरवापर झाल्यास पदे काढून टाकीन आणि जबाबदारांना थेट तुरुंगात टाकीन,” असा इशारा त्यांनी दिला.
यावेळी अजित दादांनी बाजार समितीच्या चेअरमन व सचिवांना स्पष्ट शब्दांत कानउघडणी करत, “तुझ्या बापाचं कृषी मार्केट आहे का? हे मार्केट शेतकरी, व्यापारी आणि हमालांचे आहे,” असे थेट सवाल उपस्थित केला.
पेट्रोल पंपावरील १.५ कोटींच्या उधारीवर कारवाई
समितीच्या पेट्रोल पंपावर तब्बल दीड कोटी रुपयांची थकबाकी असल्याचे उघड झाल्यावर अजित दादा संतप्त झाले. त्यांनी व्यवस्थापकाला जबाबदार धरत तातडीने वसुलीचे आदेश दिले. तसेच, “उधारी थकवणाऱ्यांना पोलीस अधिकारी स्वतः फोन करून दाब आणावा,” असे स्पष्ट निर्देशही दिले.
कामाच्या गतीवर प्रश्नचिन्ह
गेल्या काही वर्षांत बाजार समितीला १४९ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे, मात्र वार्षिक उत्पन्न केवळ १ कोटी रुपये असल्याकडे उपमुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले. “दीडशे कोटींचे काम करायला दीडशे वर्षे लागतील का? लाज काही आहे का?” असा जळजळीत सवाल करत त्यांनी कारभारातील ढिसाळपणा उघड केला.
भ्रष्टाचाराविरोधात कठोर इशारा
एका तक्रारीच्या पत्रात गैरप्रकारांचा उल्लेख आढळल्याने अजित पवार अधिकच भडकले. “मी करोडो रुपयांचा निधी आणतो आणि तुम्ही असे गैरप्रकार करता? हे अजिबात सहन केले जाणार नाही,” असे ठणकावत त्यांनी संबंधितांना ५ ऑक्टोबर रोजी पुन्हा बोलावण्याचे आदेश दिले.
गैरप्रकार आणि गुंडगिरीवर कारवाईचे आदेश
बाजार परिसरात नशा करणारे, शस्त्र बाळगणारे आणि गुंड प्रवृत्तीचे लोकांवर तातडीने कठोर कारवाई करावी, अशा स्पष्ट सूचना त्यांनी पोलिसांना दिल्या.
इतर APMCवर लक्ष द्यावे अशी मागणी
बारामतीप्रमाणेच मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर बाजार समित्यांच्या कारभारावरही अजित पवारांनी लक्ष द्यावे, अशी मागणी बाजार घटकांकडून जोर धरत आहे.