माणुसकीला लाज वाटावी अशी घटना, पुण्यात अतिशय संतापजनक प्रकार, अल्पवयीन मुलीची काय चूक होती?
 
पुणे: महाराष्ट्रात माणुसकी मेली आहे का? असा प्रश्न निर्माण व्हावा, अशा घटना सध्या घडताना दिसत आहेत. विशेष म्हणजे पुणे या शहराला विद्येचं माहेरघर मानलं जातं. पुणे शहराकडे नागरीक चांगल्या भावनेने बघत असतात. देशभरातील विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात जातात. पण याच विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात एका 17 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार अत्याचार करण्यात आला आहे. आरोपींनी तिला डांबून ठेवत तिच्यावर वारंवार अत्याचार केला. तसेच तिच्याकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला. संबंधित प्रकार अतिशय संतापजनक आणि किळसवाणा आहे. पीडित मुलीच्या वडिलांच्या आजारपणासाठी घेतेलेले अवघ्या 30 हजार रुपयांसाठी आरोपींनी हे कृत्य केलं आहे. संबंधित प्रकार उघड झाल्यानंतर संपूर्ण शहरातून संताप व्यक्त केला जातोय. या घटनेत पीडितेचा काय दोष होता? तिच्यासोबत इतकं निर्घृण कृत्य करणाऱ्या आरोपींना तिची जरासुद्धा दया आली नाही का? असा प्रश्न उपस्थित होतोय. विशेष म्हणजे या प्रकरणातील आरोपी हे पती-पत्नी आहेत. त्यामुळे आरोपी महिलेला पीडितेबाबत कोणतीही सहानुभूती वाटली नसावी? आरोपी महिला इतकी निर्दयी असावी? असे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहेत.
नेमकं प्रकरण काय?
पुण्यातून एक धक्कादायक आणि अतिशय संतापजनक अशी घटना समोर आली आहे. एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणीला 15 दिवस डांबून तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. वडिलांच्या आजारपणासाठी उसने घेतलेले पैसे न दिल्याने आरोपींनी अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी पीडितेला 15 दिवस लाँजमध्ये डांबून तिच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करुन घेतला. पुण्यातील 3 लाँजमध्ये जाऊन तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला. हा सगळा प्रकार मागील ऑक्टोबरपासून सुरू होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात पोक्सोसह इतर कलमांच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी पूनम माने (वय 22) आणि आकाश माने (वय 24) या दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला. तसेच पूनम माने हिला पोलिसांनी अटक केलीय. तर तिचा नवरा आकाश हा फरार आहे.
पोलिसांना घटनेची माहिती कशी मिळाली?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील आजारी असताना त्यांनी फिर्यादी दाम्पत्ययाकडून उपचारासाठी 30 हजार रुपये उसने घेतले होते. मात्र काही कारणामुळे फिर्यादी यांना ते पैसे परत देता येत नसल्याने आरोपींनी तिला एका लॉज वर नेऊन तिला १५ दिवस डांबून ठेवलं. या ठिकाणी डांबून ठेवण्यात आलेल्या तरुणीवर आरोपी आकाश माने वारंवार बलात्कार केला. यावरच न थांबता या दांपत्याने तिला जिवे मारण्याची धमकी देत तिला जबरदस्तीने शरीर विक्रीस भाग पाडले आणि तिला वेशव्याव्यसाय करून आरोपींनी पैसे कमावले
पोलिसांना काल पुण्यातील के के मॉल जवळ एका लॉजमध्ये एका मुलीला डांबून ठेवल्याची माहिती मिळाली होती. यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीची सुटका केली. आता ज्या लॉज वर हे प्रकार घडले आहेत त्या सर्व लॉज मालकांची देखील चौकशी आता पोलीस करणार आहेत. याप्रकरणी आकाश ची पत्नी पूनम हिला अटक केली असून आकाश माने सध्या फरार आहे.