आण्णासाहेब पाटील महामंडळात शीतयुद्ध! अध्यक्ष–एमडी आमने-सामने, गंभीर आरोपांनी खळबळ
-मराठा तरुण उद्योजक होऊ नयेत म्हणून सुपारी? महामंडळाच्या एमडींवर नरेंद्र पाटील यांच्या   थेट आरोप
-कर्ज मंजुरी थांबवली, जाचक अटी लादल्या महामंडळाच्या कारभारावर अध्यक्षांची तोफ
-प्रक्रिया बाजूला ठेवून मनमानी कारभार! आण्णासाहेब पाटील महामंडळात अंतर्गत संघर्ष उघड
-विखे-पाटीलांनी समज दिली तरी बदल नाही महामंडळातील वाद चिघळला
एपीएमसी न्यूज़ नेटवर्क:
आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळात अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (एमडी) यांच्यातील अंतर्गत वाद उघडकीस आला असून, महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी एमडी विजयसिंह देशमुख यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मराठा समाजातील तरुण उद्योजक होऊ नयेत, यासाठीच महामंडळाच्या योजनांमध्ये जाणीवपूर्वक अडथळे निर्माण केले जात असल्याचा खळबळजनक आरोप पाटील यांनी केला आहे.
मराठा समाजातील तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या या महामंडळाने आतापर्यंत राज्यात एक लाखांहून अधिक उद्योजक घडवले आहेत. आता पाच लाख उद्योजक निर्माण करण्याचे उद्दिष्ट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले असतानाच, महामंडळाच्या कारभारावरून वाद पेटला आहे.
अध्यक्ष नरेंद्र पाटील म्हणाले, “एमडी विजयसिंह देशमुख यांच्याकडून मराठा समाजासाठी सकारात्मक काम होईल अशी अपेक्षा होती. मात्र, ९ ऑक्टोबर २०२५ पासून महामंडळाच्या कर्ज प्रस्तावांना मंजुरी देणे थांबवण्यात आले. लाभार्थी वाढू नयेत, मराठा तरुण उद्योजक बनू नयेत यासाठीच ही भूमिका घेतली जात असल्याचा संशय आहे.”
तक्रारी वाढू लागल्यानंतर एलवाय (Loan Year/योजना) सुरू करण्यात आल्या, मात्र त्यासाठी जाचक अटी घालण्यात आल्याचा आरोपही पाटील यांनी केला. “ग्रामीण भागातील शेतकरी आणि तरुण कोणत्याच योजनेचा लाभ घेऊ शकणार नाहीत, असे कारस्थान रचण्यात आले आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
नरेंद्र पाटील यांनी एमडींच्या कार्यपद्धतीवरही तीव्र नाराजी व्यक्त केली. “महामंडळात कोणताही निर्णय अध्यक्षांच्या संमतीने आणि संचालक मंडळाच्या बैठकीत मंजूर होणे आवश्यक असते. मात्र, सध्याचे एमडी कोणतीही प्रक्रिया न पाळता मनमानी कारभार करत आहेत,” असा आरोप त्यांनी केला.
ट्रॅक्टर योजनेचे उदाहरण देताना पाटील म्हणाले, “अजित पवार उपमुख्यमंत्री असताना बंद झालेली ट्रॅक्टर योजना पुन्हा सुरू करण्याचा प्रस्ताव मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर मांडला. त्याला संमती मिळाल्यानंतर संचालक मंडळाच्या बैठकीत चर्चा करून नियमानुसार मंजुरी देण्यात आली. ही प्रक्रिया असते मात्र सध्याचे एमडी ती पूर्णपणे डावलत आहेत.”
विखे-पाटील यांची कानउघडणीही निष्फळ
महामंडळाच्या कार्यपद्धतीबाबत खासदार व आमदारांकडून सातत्याने तक्रारी येत असल्याचेही पाटील यांनी सांगितले. नागपूर हिवाळी अधिवेशनादरम्यान मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी बैठक घेऊन एमडी देशमुख यांना मनमानी कारभाराबाबत स्पष्ट शब्दांत समज दिल्याचा दावा अध्यक्षांनी केला.
“अध्यक्षांना विश्वासात घेऊन संचालक मंडळात प्रस्ताव मांडण्याच्या सूचना देऊनही एमडींच्या भूमिकेत कोणताही बदल झालेला नाही,” असा आरोप करत अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी महामंडळातील अंतर्गत संघर्ष आणखी तीव्र झाल्याचे संकेत दिले आहेत.