अण्णासाहेबांचा वारसा अडवणारा कोणी नाही – मुख्यमंत्री फडणवीस
.png)
-माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्यात घोषणा सिडको घरे, पुणे-नाशिक माथाडी प्रश्न १५ दिसत सोडवण्याचे आश्वासन
नवी मुंबई :
घर संसार संस्थान त्यागून माथाडी चळवळीचे पायाभरणी करणारे स्व. अण्णासाहेब पाटील यांचा वारसा आजही निस्वार्थ भावनेने जोपासला जात आहे. या चळवळीला कोणीही थांबवू किंवा अडवू शकत नाही, अशा गौरवोक्ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. स्व. आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या ९२ व्या जयंतीनिमित्त तुर्भे, नवी मुंबईतील कांदा-बटाटा मार्केट लिलावगृहात आयोजित माथाडी कामगारांच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले की, “समाजात दुही निर्माण न करता आपण छत्रपती शिवरायांच्या कार्याच्या दिशेने चाललो आहोत. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शासनाने व न्यायालयाने योग्य निर्णय घेतले आहेत. सारथीमार्फत हजारो अधिकारी तयार झाले आहेत. अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून दीड लाख उद्योजक निर्माण झाले असून ते आज रोजगार देणारे बनले आहेत.”
या वेळी संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी माथाडी कामगारांचे विविध प्रश्न मांडले. सिडको घरे, नाशिक-सातारा व पुण्यातील माथाडी कामगारांचे प्रश्न निकाली काढण्यासाठी मुख्यमंत्री पुढील १५ दिवसांत बैठक घेतील, असे त्यांनी आश्वासन दिले. तसेच, आरक्षणाबाबत न्याय मिळावा यासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापावे, अशी मागणीही पाटील यांनी केली.
संघटनेचे कार्याध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांनी अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीवर मदतीची मागणी केली. यासोबतच माथाडी कामगारांनी एक दिवसाचा पगार नुकसानग्रस्तांसाठी देण्याचा निर्णय घेतल्याचे जाहीर केले.
या मेळाव्यात १७ गुणवंत माथाडी कामगारांना “माथाडी भूषण” पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या लाभार्थ्यांना उद्योग उभारणीसाठी धनादेशांचे वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाला मंत्री गणेश नाईक, जयकुमार रावल, शिवेंद्रराजे भोसले, आमदार मंदाताई म्हात्रे, प्रशांत ठाकुर, महेश बालदी, माजी खासदार संजीव नाईक आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पोपटराव देशमुख यांनी केले.