अनुकंपाधारकांचा अनुशेष संपणार! राज्यात पहिल्यांदाच 10 हजारांहून अधिक उमेदवारांना एकाच दिवशी नियुक्तीपत्रे

मुंबई :मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारामुळे वर्षानुवर्षे रखडलेली अनुकंपा प्रकरणे मार्गी लागली असून ४ ऑक्टोबर रोजी तब्बल ५१८७ अनुकंपाधारक उमेदवारांना शासकीय नोकरीची नियुक्तीपत्रे मिळणार आहेत. याच कार्यक्रमात एमपीएससीतर्फे निवड झालेल्या ५१२२ उमेदवारांनाही प्रमाणपत्रे देण्यात येणार आहेत. त्यामुळे एकाच दिवशी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत दाखल होणार असून राज्याच्या इतिहासातील हा पहिलाच उपक्रम ठरणार आहे.
अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी यासाठी अनेक प्रकरणे तांत्रिक कारणांमुळे रखडली होती. कर्मचारी सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबातील सदस्याला नोकरी देण्याची ही संवेदनशील प्रक्रिया आहे. मात्र वर्षानुवर्षे ही प्रकरणे प्रलंबित राहिली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी या बाबीकडे विशेष लक्ष देत सामान्य प्रशासन विभागाला तातडीच्या सूचना दिल्या व सातत्याने आढावा घेतला. त्यानंतर नवे अनुकंपा धोरण तयार करण्यात आले आणि परिणामी हजारो कुटुंबांना न्याय मिळणार आहे.
दरम्यान, या नियुक्त्यांमध्ये कोकण विभागातील ३०७८ उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे. त्यानंतर विदर्भातील २५९७, मराठवाड्यातील १७१०, पुणे विभागातील १६७४ आणि नाशिक विभागातील १२५० उमेदवार सामील आहेत.
या उपक्रमाला मुख्यमंत्री फडणवीस यांनी हाती घेतलेल्या १०० आणि १५० दिवसांच्या प्रशासकीय सुधारणांच्या कार्यक्रमातील मोठे यश मानले जात आहे.