पणन संचालक व सदस्यांनी केली संचालक मंडळाची ‘दिवाळी कडू’!

‘संचालकांची बेकायदेशीर सभा’ रद्द APMC प्रशासनावर निष्काळजीपणाचे ताशेरे
नवी मुंबई :मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळाची दिवाळी गोड नव्हे तर ‘कडू’ झाली आहे. पणन संचालक आणि काही मार्केट सदस्यांच्या ठाम भूमिकेमुळे (८ ऑक्टोबर) होणारी संचालक मंडळाची सभा रद्द करण्यात आली.
एपीएमसी प्रशासनाने सभेची संपूर्ण माहिती आणि अजेंडा ठराविक कालावधीत पणन संचालनालयाला न पाठवल्याने हा वाद पेटला. नियमानुसार, संचालक मंडळाच्या सभेची माहिती १० दिवस आधी पणन संचालनालयाला देणे बंधनकारक आहे. मात्र प्रशासनाने ही प्रक्रिया न पाळल्याने पणन संचालनालयाने जाब विचारत एपीएमसी प्रशासनाला पत्र पाठवले.त्यानंतर प्रशासनाने काही संचालकांसह घाईघाईने अजेंडा तयार करून पणन संचालकांकडे पाठवला. पणन संचालकांनी तो नाकारल्याची माहिती मिळाली आहे.तरी सुद्धा सभापती व सचिव खंडागले यांनी ८ ऑक्टोबर रोजी सभा बोलावली.
“सभापती व सचिवांचा भोंगळ कारभार उघड” — निलेश विरा
धान्य मार्केट सदस्य निलेश विरा यांनी अजेंडा नोट्स वेळेवर न दिल्याचा आरोप करत ही बैठक ‘बेकायदेशीर’ ठरवली. त्यांनी हे निवेदन पणन संचालक आणि सर्व सदस्यांना मेलद्वारे पाठवले. आणखी एका संचालकानेही आक्षेप घेतल्याने अखेर सभा रद्द करण्यात आली .
‘बेकायदेशीर मंजुरीचे’ प्रयत्न फसले?
एपीएमसी प्रशासनाने मागील कामांना मंजुरी मिळवण्याचा प्रयत्न केला मात्र तो अयशस्वी ठरला. विरा यांनी म्हटलं की, “हे सगळं गैरप्रकारांना झाकण्यासाठीचं षडयंत्र आहे.”
एपीएमसी मुख्यालय गुप्त बैठक रात्री १० वाजेपर्यंत! 
७ ऑक्टोबरला रात्री उशिरापर्यंत सभापती व काही सदस्यांनी मुख्यालयात बसून मागच्या विकासनामा मंजुरीसाठी धोरण आखले होते , अशी माहिती एका संचालकांनी नाव न सांगण्याची अटी शर्तीवर दिली.
“भत्ता देऊ नका, दिल्यास वसुली करा” — विरा
विरा यांनी बैठकीसाठी भत्ता देऊ नये, दिल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या पगारातून वसुली करण्याचा इशारा दिला.
७०० किमी प्रवास करून आलेल्या संचालकांना ‘दिवाळी कडू’
राज्यभरातून आलेल्या संचालकांनी लांब प्रवास केला, पण सभा रद्द झाल्याने त्यांची दिवाळी ‘कडू’ झाली, अशी चर्चा बाजार आवारात रंगली.