Baba Siddique Case: 65 गोळ्या आणि बाइकऐवजी ऑटोचा वापर,आरोपींनी असा रचला कट; वाचा 10 BIG UPDATES
Baba Siddique Case:   माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) नेते बाबा सिद्दीकी यांची 12 ऑक्टोबर रोजी हत्या करण्यात आली. त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेरच बाबा सिद्दीकींवर गोळ्या झाडण्यात आल्या. या प्रकरणाचा तपास सुरू आहे आणि दरदिवशी याबाबत नवनवीन खुलासे समोर येत आहेत. बाबा सिद्दीकींची हत्या करण्यासाठी आरोपींनी अत्यंत बारकाईने कट रचला होता, अशी धक्कादायक माहितीही समोर आली आहे. तपासादरम्यान आतापर्यंत कोणकोणती माहिती समोर आली आहे? याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया... 
1. बाबा सिद्दीकींची हत्या करताना गोळ्यांची कमतरता भासू नये म्हणून आरोपी स्वतःसोबत 65 गोळ्या घेऊन आले होते. पोलिसी सूत्रांनुसार सिद्दीकींवर एकूण सहा गोळ्या झाडण्यात आल्या, घटनास्थळावरून पुंगळ्या  देखील ताब्यात घेण्यात आल्या.
2. आरोपी गुरमेल सिंह आणि धर्मराज कश्यप या दोघांकडून ऑस्ट्रिया मेड पिस्तूल आणि देशी कट्टा अशी दोन हत्यारे जप्त करण्यात आली.  
3. पोलिसांना 15 ऑक्टोबरला घटनास्थळापासून काही अंतरावर काळ्या रंगाची एक बॅगही सापडली होती. ज्यामध्ये एक टर्किश मेड 7.62 बोर पिस्तूल आणि 30 जिवंत काडतुसे होती. पोलिसांना  या बॅगमध्ये शिव कुमार गौतम आणि सुमित कुमार असे नाव असलेली आधार कार्डही सापडले.  
4. सूत्रांच्या माहितीनुसार, हत्येसाठी तीनही आरोपी बाइकचा वापर करणार होते. पण काही दिवसांपूर्वीच दोन आरोपींचा अपघात झाला. याच कारणामुळे त्यांनी रिक्षाच्या मदतीने बाबा सिद्दीकींची हत्या करण्याचा निर्णय घेतला. इतकेच नव्हे तर हत्या केल्यानंतर तिघांनीही स्वतःचे कपडे बदलले, जेणेकरून त्यांना तातडीने पळ काढणे शक्य होईल. हा त्यांच्या कटाचा भाग होता.
5. बाइक घेण्यासाठी आरोपींनी हरीश कुमार बालकरामला 60 हजार रुपये ट्रान्सफरही केले होते, या रकमेतून त्यांनी 32 हजार रुपयांची जुनी बाईक खरेदी केली. 
6. यादरम्यान फरार मुख्य आरोपीपैकी एक शुभम लोणकरविरोधात मुंबई पोलिसांनी लुक आऊट सर्क्युलर (LOC) नोटिस जारी केले.  सूत्रांनुसार शुभम नेपाळमध्ये पलायन करू शकतो, अशी पोलिसांना शंका आहे. म्हणूनच पोलिसांनी शुभमचे फोटो नेपाळ बॉर्डर परिसरातही सर्क्युलेट केले आहेत. 
7. पोलिसी सूत्रांनुसार आरोपीने यापूर्वीही 10 वेळा बाबा सिद्दीकींची हत्या करण्याचा कट रचला होता. शूटर्सनी महिन्याभरात वांद्रे येथील वेगवेगळ्या जागांवर बाबा सिद्दीकींचा पाठलाग केला होता. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, बाबा सिद्दीकी मोकळ्या जागेत असताना त्यांच्यावर हल्ला करण्याची सूचना आरोपींना आधीच देण्यात आली होती.
8. पोलिसांनी बुधवारी (16 ऑक्टोबर) बाबा सिद्दीकी यांचा मुलगा झिशान सिद्दीकी यांचाही जबाब नोंदवला. हत्या प्रकरणामध्ये कोणावर शंका आहे का आणि त्यांचे कोणासोबत वैर होते का? असे प्रश्न पोलिसांनी झिशान सिद्दीकी यांना विचारले. 
9. बाबा सिद्दीकी हत्याकांड प्रकरणामध्ये पोलिसांनी आतापर्यंत तीन संशयित आरोपी गुरमेल बलजीत सिंह (23), धर्मराज राजेश कश्यप (19) आणि प्रवीण लोणकरला अटक केली आहे. संशयित हँडलर मोहम्मद झिशान अख्तर देखील वाँटेड आहे. 
10. पोलीस चौकशीदरम्यान अटकेत असलेल्या आरोपींनी असाही दावा केलाय की, बाबा सिद्दीकी किंवा त्यांचा मुलगा झिशान सिद्दीकीची हत्या करण्याची सुपारी मिळाली होती