जळगावमध्ये केळी समूह विकास केंद्र – शेतकऱ्यांसाठी जागतिक बाजारपेठेचे दरवाजे उघडे

जळगाव : जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादकांसाठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने देशभरात जाहीर केलेल्या काही निवडक समूह विकास केंद्रांमध्ये (क्लस्टर) जळगाव जिल्ह्यातील केळी पिकाचा समावेश करण्यात आला असून, या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची अधिसूचना जाहीर झाली आहे.
उद्देश
या प्रकल्पामागचा उद्देश शेतकऱ्यांना स्थिर आणि लाभदायी बाजारपेठ उपलब्ध करून देणे तसेच केळी निर्यातीसाठी जागतिक पातळीवर (विशेषतः रशिया व आखाती देश) नवीन दारे उघडणे हा आहे. भुसावळ येथून रेल्वेमार्गे थेट जेएनपीटी बंदरापर्यंत वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले असून, त्यामुळे वाहतुकीचा खर्च कमी होऊन केळी वेळेवर आणि गुणवत्तापूर्ण स्वरूपात बंदरात पोहोचेल.
प्रकल्पाचा विस्तार
• जळगाव जिल्ह्यातील २० हजार हेक्टर केळी क्षेत्राला लाभ
• पहिल्या टप्प्यात १०० कोटी रुपयांपर्यंत आर्थिक सहाय्य
• प्रत्येक घटकासाठी ४० टक्क्यांपर्यंत निधीची तरतूद
• प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे उद्दीष्ट – पुढील चार वर्षे
पायाभूत सुविधा
या क्लस्टर अंतर्गत शेतकऱ्यांसाठी अत्याधुनिक सुविधा उभारल्या जाणार आहेत :
• ५० मेट्रिक टन क्षमतेची ५० पॅक हाऊस
• १५०० मेट्रिक टन क्षमतेचे १० केळी पिकवण कक्ष
• २३ प्रक्रिया केंद्र, २५ प्री-कुलिंग युनिट, ४ इंटीग्रेटेड कोल्ड चेन
• १० रीफर मालमोटारी, २० किरकोळ आउटलेट, १५ ग्रामीण बाजार
• ३ आंतरराष्ट्रीय ब्रँडिंग मोहिमा, ३ टिश्यूकल्चर प्रयोगशाळा
• २ प्लांट हेल्थ क्लिनीक, १०० हेक्टरवरील टिश्यूकल्चर रोप प्रकल्प
• ३७५ कृषी यांत्रिकीकरण बँक (ट्रॅक्टर, फवारणी यंत्र, सिंचन प्रणाली)
• ५ हजार हेक्टरवरील प्लास्टिक बॅग संरक्षण, १ हजार हेक्टरवरील गॅप सर्टिफिकेशन
अर्ज कोण करू शकेल?
शेतकरी उत्पादक कंपन्या, त्यांचे संघ, सहकारी संस्था, अन्न प्रक्रिया व वाहतूक क्षेत्रातील उद्योजक, मंडळे आणि सार्वजनिक क्षेत्रातील संस्था अर्ज करू शकतील. विशेष म्हणजे, शेतकरी उत्पादक कंपन्यांना अनुभव व उलाढालीच्या अटींमध्ये ५०% सूट तर सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना शुल्कात सवलत देण्यात आली आहे. प्रस्ताव सादर करण्याची अंतिम मुदत ९ सप्टेंबर असून अर्ज राष्ट्रीय बागवानी बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन करता येणार आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांचे मत
“समूह विकास केंद्रामुळे जळगावातील केळी उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठेत प्रवेश मिळणार आहे. यामुळे त्यांचे उत्पन्न वाढेल आणि जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेलाही चालना मिळेल.” – आयुष प्रसाद, जिल्हाधिकारी, जळगाव