‘डिजिटल अरेस्टर्स’ना दणका; देशातील 77 हजार व्हॉट्सॲप क्रमांक ब्लॉक

मुंबई : देशभरात ‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली नागरिकांना गंडा घालण्याचे प्रमाण वाढले आहे. याबाबत केंद्रीय गृहमंत्रालयाने पावले उचलली असून, ‘आयफोरसी’च्या (इंडियन सायबर क्राइम को-ऑर्डिनेशन सेंटर) माध्यमातून देशातील सायबर गुन्हेगारांच्या ७७ हजारांहून अधिक क्रमांकाचा शोध लावून त्यांचे व्हॉट्सॲप ब्लॉक केले आहे. तसेच ‘स्काइप’च्या हजारो खात्यांवरदेखील कारवाई करण्यात आली आहे.
पोलीस, सीबीआय, ईडी किंवा कस्टममधील अधिकारी असल्याची बतावणी करत सायबर गुन्हेगार नागरिकांना ‘डिजिटल अरेस्ट’ करतात.
व्हिडीओ कॉलिंगसाठी ‘स्काइप’चा वापर
या स्कॅम्समधील व्हॉइस व व्हिडीओ कॉलिंगसाठी सायबर गुन्हेगार प्रामुख्याने व्हॉट्सॲप कॉलिंग व स्काइपचा उपयोग करतात.
‘आयफोरसी’ने मागील काही महिन्यांत आलेल्या तक्रारींच्या तपासादरम्यान सायबर गुन्हेगारांच्या ७७ हजार १९५ व्हॉट्सॲप क्रमांकांचा शोध लावला व त्यांना ब्लॉक केले. याशिवाय ३ हजार २५५ स्काइप खातीदेखील ब्लॉक केली आहेत.
सव्वानऊ लाख बँक खात्यांवर हंटर
ऑनलाइन गंडा घातल्यानंतर सायबर गुन्हेगार विविध बँक खात्यात रक्कम वळती करतात. यातील बहुतांश बँक खाती ही गरीब लोकांकडून भाडेतत्त्वावर व नकळतपणे घेतलेली असतात.या खात्यांचे पासबुक, एटीएम कार्ड सर्व सायबर गुन्हेगारांच्या टोळीकडेच असते. ‘लोकमत’ने ही ‘मोडस ऑपरेंडी’ मागील वर्षीच बाहेर आणली होती.
या खात्यांना शोधण्यासाठी ‘सीएफएमसी’ची (सायबर फ्रॉड मिटिगेशन सेंटर) स्थापना केली असून त्यात मोठ्या बँका, वित्तीय संस्था, पेमेंट अग्रिगेटर्स, टेलिकॉम कंपन्या, आयटी तज्ज्ञ व विविध राज्यांच्या एजन्सीजचे प्रतिनिधी सहभागी आहेत. आतापर्यंत ‘सीएफएमसी’ने ९.२३ लाख ‘म्युच्युअल अकाउंट्स’चा शोध लावला आहे.
सात लाखांहून अधिक सिमकार्डदेखील ब्लॉक
देशभरातील सात लाखांहून सिमकार्ड ब्लॉक करण्यात आले आहेत, तर २.०८ लाख आयएमईआय क्रमांकांचा शोध लावत ते मोबाइलदेखील ब्लॉककेले आहेत.
सायबर गुन्हेगारांकडून एकाच वेळी हजारो सिमकार्डचा उपयोग करण्यात येत असतो.
हे आहेत डिजिटल अरेस्ट स्कॅमचे ‘हॉटस्पॉट’
मेवात, जामतारा, अहमदाबाद, हैदराबाद, चंडीगड, विशाखापट्टणम, गुवाहाटी येथे डिजिटल अरेस्ट स्कॅमचे हॉटस्पॉट्स आहेत. या हॉटस्पॉट्ससाठी सात ‘जॉइंट सायबर कोऑर्डिनेशन टीम्स’ स्थापन करण्यात आल्या आहेत.