BIG BREAKING! सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारकडून 24 दिवसांची मुदतवाढ, शेतकऱ्यांना दिलासा, किसान सभेकडून निर्णयाचं स्वागत

केंद्र सरकारनं सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. सोयाबीन खरेदीसाठी केंद्र सरकारनं 24 दिवसांची मुदतवाढ दिली आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचे किसान सभेकडून स्वागत करण्यात आलं आहे. राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी बाकी होती. आता या निर्णयामुळं मोठ्या प्रमाणात पुन्हा हमीभावानं सोयाबीनची खरेदी केली जाणार आहे.
किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक ठिकाणची खरेदी केंद्र सुरु नाहीत. जी केंद्र सुरु आहेत तिथे पॅकिंगसाठी पुरेसा बारदान उपलब्ध करुन द्यावा. सरकारने त्यासाठी पावले टाकावीत अशी मागणी डॉ. अजित नवले यांनी केली आहे. निधी उपलब्ध करुन द्यावा आणि अधिक मात्रेने सोयाबीनची खरेदी करावी, मागणीनुसार सरकारी सोयाबीन केंद्र वाढवावे अशी मागणी देखील अजित नवलेंनी केली आहे.
सोयाबीन खरेदीची मुदत संपल्यानं शेतकरी चिंतेत होते
सोयाबीन खरेदी बंद केल्याने अनेक शेतकरी वंचित आहेत. लाखो शेतकऱ्यांचे सोयाबीन पडून आहे. खरेदी केंद्राबाहेर अजूनही शेतकऱ्यांच्या रांगा आहेत. सोयाबीन खरेदी बंद झाल्याने अनेक शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यामुळं सरकारने खरेदी केंद्राची मुदत वाढवून पुन्हा सोयाबीन खरेदी सुरु करावी अशी मागणी अजित नवलेंनी केली होती. अन्यथा किसान सभा राज्यभर आंदोलन छेडणार असून, कृषीमंत्र्यांच्या घरावर सोयाबीन ओतणार असल्याचा इशारा डॉ. अजित नवले यांनी सरकारला दिला. संपूर्ण राज्यामध्ये सोयाबीन खरेदी मोठ्या प्रमाणावर होत असताना या सोयाबीन खरेदीची मुदत संपली होती. त्यानंतर राज्यातील बहुतेक जिल्ह्यात सोयाबीन खरेदीला मुदत वाढ मिळण्याची मागणी केली जात होती. या पार्श्वभूमीवर राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी सोयाबीन खरेदीला मुदतवाढ मिळावी यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला होता. अखेर केंद्र सरकारनं आणखी 24 दिवस सोयाबीन खरेदीला मुदतवाढ दिली आहे.