BIG BREAKING | राष्ट्रवादी फुटीचा नाशिकमध्ये पहिला भडका, दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आमनेसामने, तणावाचं वातावरण
 
नाशिक : नाशिकमध्ये मोठा पॉलिटिकल ड्रामा बघायला मिळतोय. महाराष्ट्राच्या राजकारणात दोन दिवसांपूर्वी मोठा राजकीय भूकंप घडला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आणि ते थेट सत्तेत सहभागी झाले. त्यांच्या कृतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे दिग्गज नेते छगन भुजबळ हे देखील भाजपसोबत गेले आहेत. भुजबळ यांची नाशिकमध्ये पक्षात चांगली पकड आहे. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात उभी फूट पडल्यामुळे नाशिकमध्ये मोठा गदारोळ बघायला मिळत आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर शरद पवार आणि अजित पवार यांचे समर्थक आमनेसामने आले आहेत. दोन्ही बाजूने प्रचंड घोषणाबाजी सुरु आहे.