Big Breaking : आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, कुणाला सर्वाधिक जागा?; वंचित आत की बाहेर?
 
*Big Breaking : आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला, कुणाला सर्वाधिक जागा? वंचित आत की बाहेर?*
मुंबई: देशात केव्हाही लोकसभा निवडणुकांच्या तारखांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. महाराष्ट्रातही महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीची जय्यत तयारी केली आहे. लोकसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवण्यासाठी महाविकास आघाडीने जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवला आहे. या फॉर्म्युल्यात ठाकरे गटाला सर्वाधिक जागा देण्यात आल्या आहेत. तसेच प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित आघाडीलाही महाविकास आघाडीने जागा सोडल्या आहेत. त्यामुळे वंचित आघाडीचा महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीत येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील लोकसभेच्या 48 जागांचं महाविकास आघाडीच्या नेत्यांनी यशस्वी वाटप केलं आहे. आघाडीने त्यासाठी एक फॉर्म्युला ठरवला आहे. या फॉर्म्युल्यानुसार ठाकरे गटाला 20, शरद पवार गटाला 10 आणि काँग्रेसला 16 जागा सोडण्यात आल्या आहेत. तर वंचित बहुजन आघाडीला दोन जागा सोडण्यात आला आहे. वंचितला सोडण्यात आलेल्या जागेमध्ये अकोल्याच्या जागेचा समावेश आहे.
ठाकरे गटाला सर्वाधिक जागा का?
महाविकास आघाडीने ठाकरे गटाला सर्वाधिक जागा सोडल्या आहेत. शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याबाबत राज्यात सहानुभूती आहे. या सहानुभूतीचा फायदा करून घेण्यासाठी ठाकरे गटाला 20 जागा सोडण्यात आल्या आहेत. तर वंचितचाही राज्यभरात प्रभाव असल्याने वंचितला एक ऐवजी दोन जागा सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्याकडून कोणताही प्रतिसाद न आल्याने त्यांच्यासाठी एकही जागा सोडण्यात आली नसल्याचं सांगितलं जात आहे.
ठाकरेंचे उमेदवार निश्चित
दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या गटाने 20 जागांवरील उमेदवार निश्चित केले आहेत. विद्यमान खासदारांना ठाकरे गटाकडून उमेदवारी देण्यात येणार आहे. तसेच इतर जागेवर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचे संकेत मिळत आहेत. तसेच मुंबईतून ठाकरे गट कुणाला उमेदवारी देणार याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच ठाकरे गटाने ठाण्यासाठी काय डावपेच आखले याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
असं ठरलं जागा वाटप…
ठाकरे गट – 20 शरद पवार – 10 काँग्रेस -16 वंचित आघाडी – 2