Big Breaking ! राष्ट्रवादी पक्ष नेमका कुठे कमी पडला? अजित पवार यांनी थेट कॅमेऱ्यासमोरच सांगितलं
 
नागपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचं सध्या नागपुरात दोन दिवसांचं चिंतन शिबिर आयोजित करण्यात आलंय. या चिंतन शिबिराच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार हे सध्या नागपूर दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विदर्भात नेमका कुठे कमी पडला? या विषयी सविस्तर प्रतिक्रिया दिली. अजित पवार हे त्यांच्या बेधडक आणि बिंदास स्वभावामुळे ओळखले जातात. याच स्वभावातून त्यांनी आज राष्ट्रवादी पक्ष विदर्भात खरंच कमी पडला याची कबुली त्यांनी भर पत्रकार परिषदेत कॅमेऱ्यासमोर दिली. यावेळी त्यांनी भाजपवर अप्रत्यक्षपणे टीकाही केली.
पश्चिम महाराष्ट्र, कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा या भागात आमच्या जागा निवडून येतात. अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक जागा निवडून येतात. पण विदर्भात हवा तसा प्रतिसाद आम्हाला मिळत नाही. या भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आमच्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी जास्त जागांवर विजय मिळवण्यासाठी प्रयत्न केले तर मग आम्ही इथल्या जागा निवडणुकीसाठी मागू शकतो”, असं अजित पवार म्हणाले.
‘विदर्भात आम्ही कमी पडलो हे निर्विवाद सत्य’
“पूर्वी आम्ही काँग्रेस सोबत एकत्र बसायचो, पण आता महाविकास आघाडी असल्याने शिवसेना ठाकरे गट, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे तीन पक्ष एकत्र बसतात आणि चर्चा करतात. विदर्भात आम्ही लोकं कमी पडलो हे निर्विवाद सत्य आहे. आता आम्ही दोन दिवसांचं शिबिर घेतलं आहे. वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या निमित्ताने आम्ही या भागात दौरे वाढवले पाहिजेत. इथे निश्चितपणे प्रयत्न केला तर जनता पाठिशी उभी राहू शकते”, असं अजित पवार म्हणाले.
आमच्याविरोधात चुकीच्या बातम्या पसरविण्याचा प्रयत्न’
“मागे एक प्रयत्न असाही झाला की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची 1999 ला स्थापना झाल्यानंतर राष्ट्रवादीकडून विदर्भाकडे अन्याय करण्याचा प्रयत्न केला जातो, अशा चुकीच्या बातम्या पसरविण्याचा प्रयत्न झाला. मी आपल्याला सांगतो, जयंत पाटील अर्थमंत्री असताना आणि मी जलसंपदा विभागाचा मंत्री असताना जास्तीत जास्त माझ्या विदर्भातील अनुशेष निघावा म्हणून आम्ही अतिशय मनापासून काम केलं. तरीही आमच्यावर आरोप झाले:, असा दावा अजित पवारांनी केला.
‘आम्हाला बदनाम करण्याचे प्रयत्न’
“आम्हाला बदनाम करण्याचे प्रयत्न झाले. आमच्यावर केसेस लागल्या, चौकशा लागल्या ही वस्तुस्थिती खरीय. या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. अशाप्रकारे जाणीवपूर्वक कुणाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणं हे बरोबर नाही. शेवटी कामं झाली पाहिजेत. कामं होत असताना ती पारदर्शकपणे झाली पाहिजेत. निर्णय झटपट झाले तर कौतुक केलं पाहिजे. झटपट केलं तर यांना एवढी घाई का झाली? आणि थोडा उशिर झाला तर कुणाची वाट बघताय? अशाप्रकारचे जाणीवपूर्वक प्रचार आणि प्रसार केला गेला. ही गोष्ट आम्ही गेल्या अनेक वर्षात अनुभवलेली आहे”, असं अजित पवार यांनी सांगितलं.