वाधवान बंधूंना मोठा फटका; ईडीने जप्त केली 70 कोटींची मालमत्ता
 
हेलिकॉप्टर, महागड्या घड्याळासह 70 कोटींची मालमत्ता जप्त वाधवान बंधूंवर ईडीची मध्यरात्री कारवाई
मुंबई : बाधवान बंधूना ईडीने मोठा झटका दिला आहे. ईडीने मध्यरात्री वाधवान बंधूंवर कारवाई केली आहे. या कारवाईत वाधवान बंधूंची 70 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे. वाधवान बंधूंवर यापूर्वीही ईडीने कारवाई केली होती. आतापर्यंत ईडीने वाधवान बंधूंची 2 हजार कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
ईडीने काल मध्यरात्री अत्यंत मोठी कारवाई केली आहे. ईडीने डीएचएफएल घोटाळा प्रकरणात वाधवान कुटुंबीयांची 70 कोटी 39 लाखांची मालमत्ता जप्त केली आहे. या मध्ये अत्यंत महागड्या वस्तूंचाही समावेश आहे. यात 28 कोटींच्या पेंटिंग्ज, 5 कोटींचे हिरे, वांद्रे परिसरातील 17 कोटींचे दोन फ्लॅट, 5 कोटींची महागडी घड्याळे आणि हेलिकॉप्टवरचे 9 कोटी अशी विविध मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. ईडीने कपिल वाधवान आणि धीरज वाधवान यांची मालमत्ता केली जप्त. आतापर्यंत या प्रकरणात जवळपास 2 हजार कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
 
काय आहे घोटाळा
डीएचएफएलचे संचालक कपिल वाधवान आणइ धीरज वाधवान यांच्यासह अन्य आरोपींनी यूनियन बँक ऑफ इंडिया (यूबीआय)च्या नेतृत्वातील बँकेत कंसोर्टियमची फसवणूक करण्यासाठी षडयंत्र रचल्याचं ईडीचं म्हणणं आहे. या कथित षडयंत्राच्या माध्यमातून कपिल वाधवान आणि अन्य बँकांच्या समूहांनी 42,871.42 कोटींच्या मोठ्या कर्जाला मंजुरी देण्यासाठी प्रोत्साहित केलं होतं, असंही ईडीने म्हटलंय. डीएचएफएलच्या वहीखात्यात षडयंत्र करून मोठी रक्कम हडपून त्याचा दुरुपयोग करण्यात आला. त्यामुळे कंसोर्टियमच्या ग्राहकांचे 34,615 कोटींचे नुकसान झाले आहे, असंही एजन्सीने म्हटलं आहे.
गेल्यावर्षीचीही धाड
दरम्यान, गेल्यावर्षी सीबीआयने डीएचएफएल घोटाळ्याप्रकरणी मुंबईत छापेमारी केली होती. त्यावेळी सीबीआयने 12 कोटी 50 लाखांची मालमत्ता जप्त केली होती. महागडी घड्याळे, पेंटिंगस, सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने यांचा समावेश होता. त्यानंतर पुन्हा आज त्याच प्रकारची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या धाडीनंतर सीबीआयने तेव्हा दहाहून अधिक लोकांना आरोपी बनवलं होतं.