साताऱ्यात 25 वर्षांमधील सर्वात मोठा बदल, पण परंपरा कायम राहणार का?
मुंबई: शरद पवारांनी 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केल्यापासून साताराकरांनी नेहमी राष्ट्रवादीला साथ दिली आहे. गेल्या 25 वर्षांमध्ये पवारांच्या पाठिशी उभं राहणाऱ्या सातारा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत यंदा एक मोठा बदल आहे. गेल्या अडीच दशकांमध्ये पहिल्यांदाच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा उमेदवार आणि घड्याळ हे चिन्ह साताऱ्याच्या निवडणुकीत नसेल. महायुतीच्या जागावाटपात ही जागा आपल्याला सुटावी यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं अटोकाट प्रयत्न केले. पण, अखेर उदयनराजे भोसले यांनी बाजी मारलीय. उदयनराजे भाजपाकडून ही निवडणूक लढवतायत. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या शशिकांत शिंदे यांचं आव्हान आहे.
पवारांचा करिश्मा दिसलेला मतदारसंघ
2019 साली झालेल्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून उदयनराजे भोसले विजयी झाले होते. त्यांनी निवडून आल्यानंतर अवघ्या साडेचार महिन्यात खासदारकी आणि राष्ट्रवादीचा राजीनामा दिला. ऑक्टोबर 2019 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत उदयनराजे भाजपाचे उमेदवार होते. त्यांच्याविरोधात शरद पवारांनी त्यांचे जिवलग मित्र श्रीनिवास पाटील यांना राष्ट्रवादीकडून उतरवलं होतं.
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला बहुमत मिळालं नाही, पण त्यांनी शिवसेनेच्या मदतीनं महाविकास आघाडीचं सरकार राज्यात स्थापन केलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. तर शरद पवार या आघाडीचे निर्माते बनले. महत्त्वाचं म्हणजे ज्या साताऱ्यात शरद पवारांनी हे भाषण दिलं होतं, तिथं उदयनराजे भोसले यांचा पराभव झाला. राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील पोटनिवडणुकीत विजयी झाले.
यशवंतराव ते शरदराव
गेली 25 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवारांना साथ देणारा सातारा यापूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी 1967 ते 84 या कालावधीत साताऱ्याचं प्रतिनिधित्व केलं होतं. 1977 साली आणिबाणीनंतर झालेल्या निवडणुकीत देशभर काँग्रेसविरोधी वातावरण होतं. इंदिरा गांधी यांचा रायबरेलीत पराभव झाला. पण, सातारामध्ये यशवंतराव चव्हाण आणि कराडमध्ये प्रेमलकाकी चव्हाण विजयी झाले होते. यशवंतरावनंतर काँग्रेसकडून प्रतापराव भोसले आणि अभयसिंह राजे भोसले यांनी साताराचं प्रतिनिधित्व केलं आहे.
1996 साली झालेली निवडणूक मात्र अपवाद ठरली. त्या निवडणुकीत शिवसेनेचे हिंदुराव निंबाळकर विजयी झाले. काँग्रेसमधील अंतर्गत कलहाचा त्यांना फायदा झाला. 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली. त्या निवडणुकीत लक्ष्मणराव जाधव-पाटील विजयी झाले. 2004 मध्ये त्यांनी पुन्हा एकदा विजय मिळवला. त्यानंतर उदयनराजे भोसले यांनी तीन वेळा राष्ट्रवादी आणि घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढली आणि जिंकली. 2019 मध्येच त्यांनी पक्षांतर केलं. त्यावेळी साताराकरांनी आपला कौल उदयनराजेंना नाही तर शरद पवारांच्या बाजूनं आहे हे दाखवून दिलं. श्रीनिवास पाटील खासदार बनले.
पक्षीय बलाबल
सातारा लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यामध्ये सातारामध्ये भाजपाचे शिवेंद्रराजे भोसले आमदार आहेत. पाटणमध्ये शिवसेनेचे शंभुराज देसाई, कराड दक्षिणमध्ये काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण, कराड उत्तरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे बाळासाहेब पाटील, वाईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे मकरंद पाटील तर कोरेगावमधून शिवसेनेचे महेश शिंदे आमदार आहेत. सहापैकी चार जागा या महायुतीकडं असून दोन जागांवर महाविकास आघाडीचे आमदार आहेत.
2019 साली झालेल्या निवडणुकीत सातारा आणि कोरेगाव वगळता उर्वरित चारही विधानसभा मतदारसंघात श्रीनिवास पाटलांना आघाडी होती. त्यामुळे ही लढाई यंदाही चुरशीची होणार आहे.
उदयनराजेंची जादू चालणार?
उदयनराजे भोसले त्यांच्या खास स्टाईलमुळे राज्यभर फेमस आहेत. त्यांची तरुणांमध्ये मोठी क्रेझ असून सातारा शहरात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यातच चुलत भाऊ आणि शिवेंद्रराजे भोसले यांचीही साथ मिळाल्यानं त्यांची बाजू आणखी भक्कम झालीय.
शरद पवार प्रतिष्ठा राखणार?
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतर ही पहिलीच निवडणूक आहे. शरद पवारांसाठी सर्वात सेफ मतदारसंघ अशी साताराची आजवरची ओळख आहे. ही ओळख टिकवण्यासाठी शरद पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. पवारांनी यावेळी त्यांचे एकनिष्ठ सहकारी शशिकांत शिंदे यांना मैदानात उतरवलंय. सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या लढतीमुळे बारामतीची लढाई अटीतटीची बनलीय. त्याचवेळी साताऱ्यात प्रतिष्ठा राखण्याचं शरद पवारांपुढं आव्हान आहे. 2014 च्या पोटनिवडणुकीप्रमाणे यंदाही सहानुभूतीची लाट आपल्याला मदत करेल. 25 वर्षांपासून एकनिष्ठ असलेला मतदार नव्या चिन्हावरही साथ देईल अशी पवारांना आशा आहे.   तर मागील निवडणुकीच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी उदयनराजे आणि भाजपा प्रयत्न करणार असून त्यांना यावेळी अजित पवारांची साथ किती मिळते ही बाब देखील निवडणूक निकालात निर्णायक ठरु शकते.
कधी होणार मतदान?
सातारा लोकसभा मतदारसंघात तिसऱ्या टप्प्यात 7 मे रोजी मतदान होणार आहे. निवडणुकीचा निकाल 4 जून रोजी लागेल.