खोके, फोडाफोडीला लगाम, कर्नाटकातील निकालाने कुणाला टेन्शन - महाराष्ट्रातही पुनरावृत्ती होणार?
 
खोके, फोडाफोडीला लगाम, कर्नाटकातील निकालाने कुणाला टेन्शन? महाराष्ट्रातही पुनरावृत्ती होणार?
कर्नाटकात सत्ता परिवर्तन झालं आहे. राज्यातील जनतेने काँग्रेसला कौल दिला आहे. जे कर्नाटकात घडलं तेच महाराष्ट्रात घडू शकतं अशी चर्चा आता सुरू झाली आहे. 
मुंबई : कर्नाटकात काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. कर्नाटकातील विधानसभा निवडणुकीचे कल हाती आले आहेत. काँग्रेसने 125 जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजपला अवघ्या 70 जागा मिळताना दिसत आहेत. जेडीएसनेही 22 जागांवर आघाडी घेतली आहे. तर इतर पक्षांना केवळ 7 जागा मिळताना दिसत आहे. राज्यात बहुमतासाठी 113 संख्याबळ आवश्यक आहे. त्याच्याही पेक्षा काँग्रेसने अधिक जागा मिळवल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस कर्नाटकात स्वबळावर सत्ता स्थापन करू शकेल, अशी परिस्थिती आहे.
गेल्या आठ वर्षात एखाद्या राज्यात मिळवलेला काँग्रेसने हा सर्वात मोठा विजय आहे. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिळालेला हा विजय काँग्रेससाठी बळ देणारा आहे. कर्नाटकातील जनतेने भाजपला पूर्णपणे नाकारले आहे. कानडी जनतेने भाजपच्या फोडाफोडी आणि खोक्याच्या राजकारणाला पूर्णपणे झिडकारलं आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनीही हेच विश्लेषण केलं. त्यामुळे जे कर्नाटकात घडलं, तेच महाराष्ट्रात घडेल काय? अशी चर्चा आता सुरू झाली आहे. महाराष्ट्रातील जनताही फोडाफोडीच्या राजकारणाला तिलांजली देणार काय? असा सवालही केला जात आहे.
या 17 आमदारांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपच्या तिकीटावर 17 पैकी 15 जण निवडून आले होते. राज्यात भाजपचं सरकार स्थापन झालं होतं. बीएस येडियुरप्पा हे मुख्यमंत्री झाले होते. या 17 आमदारांना फोडण्यात येडियुरप्पा यांचा मोठा हात असल्याचं सांगितलं जात होतं. तसेच आमदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी घोडेबाजार झाल्याची चर्चा होती. काँग्रेसचं सरकार असताना भाजपने फोडाफोडी करून पैसा आणि सत्तेच्या बळावर आमदारांना फोडल्याचं कानडी जनतेला पटलेलं नव्हतं. त्याचेच परिणाम आजच्या निकालातून दिसून आले आहेत. कानडी जनतेने काँग्रेसला पूर्ण बहुमत दिलं आहे.
महाराष्ट्रात काय घडलं?
महाराष्ट्रातही एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केलं. शिवसेनेचे 40 आणि अपक्ष दहा असे 50 आमदार घेऊन त्यांनी भाजपशी हातमिळवणी केली आणि मुख्यमंत्री झाले. त्यावेळीही मोठा घोडेबाजार झाल्याचं सांगितलं जातं. विरोधकांनी तर शिंदे सरकारला खोके सरकारचं संबोधायला सुरुवात केली आहे. शिंदे यांचं बंड एवढ्यावरच थांबलं नाही. त्यांनी आमदारांना फोडतानाच शिवसेनेवर दावा केला. शिवसेनेचं पक्ष चिन्ह आणि नावही मिळवलं.
बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली. वाढवली आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे शिवसेनेची धुरा दिली. तरीही शिवसेना फोडण्यात आली. आज ठाकरे कुटुंब शिवसेनेचं नाव आणि चिन्ह वापरू शकत नाही. अशा प्रकारचं राजकारण इथल्या लोकांनाही पटलेलं नाही. म्हणूनच जे कर्नाटकात झालं, ते उद्या महाराष्ट्रातही घडू शकतं, असं राजकीय विश्लेषकांचं म्हणणं आहे. आजच्या कर्नाटकातील निकालांनी राज्यातील सत्ताधाऱ्यांनाही टेन्शन आलं असेल, असंही राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.