Buldhana Accident News : चारही धाम एकत्र केले, पण मैत्रीण आणि कुटुंबीयमध्येच सोडून गेले… बुलढाणा अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचा टाहो
 
-बुलढाण्यात दोन खाजगी बसचा भीषण अपघात 6 प्रवाशांचा मृत्यू तर २२ जखमी
बुलढाणा | 29 जुलै 2023 : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे दोन ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात सहाजण ठार झाले आहेत. तर 22 जण जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर हा भीषण अपघात झाला. दोन्ही ट्रॅव्हस समोरासमोर येऊ धडकल्याने हा अपघात झाला. यातील एक ट्रॅव्हल्स महाराष्ट्र दर्शन करून येत होती. या बसमध्ये भाविक आणि पर्यटक होते. त्यातील काहींचा या अपघातात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या अपघातानंतर मृतांच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. थोड्यावेळापूर्वी आपल्यासोबत असलेले आपले आप्तेष्टच आपल्याला सोडून गेल्याचा धक्का या लोकांना सहन होत नाहीये.
काय बोलावं हेच आम्हाला कळत नाहीये. आमचं मन हेलावून गेलं आहे. आम्हाला धक्का बसला आहे, असं म्हणत एका प्रवाशाने हंबरडा फोडला. आम्ही यात्रेवरून घरी येत होतो. चारही धाम आम्ही सर्वांनी एकत्र केले. आता घरी पोहोचण्याची वेळ आली आणि मैत्रीण अन् कुटुंबीयांनी साथ सोडली. अपघातात त्यांचा मृत्यू झाला, असं हा प्रवाशी सांगत होता. मोठा आवाज झाला आणि बस जोरात आदळली. काचांमधून लोकांनी आम्हाला बाहेर काढलं. स्थानिक लोक आणि पोलिसांनी आम्हाला खूप मदत केली, असं हा प्रवाशी सांगत होता. यावेळी त्याने जोराचा टाहो फोडला. त्याला दुखावेग झाला.
वाहतूक कोंडी, प्राशांचा खोळंबा
या बसमधून साधारण 50 प्रवाशी प्रवास करत होते. मध्यरात्री अपघात झाल्यानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यास सुरुवात केली. दोन बसचा अपघात झाला. त्यांचा चेंदामेंदा झाला. रस्त्यावरच या बस होत्या. त्यामुळे या रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. रात्रीचा अंधार असल्याने वाहतूक कोंडी दूर करण्यात अडथळे येत होते. शेवटी रस्त्यावरून दोन्ही बस हटवल्यावर वाहतूक कोंडी दूर करण्यात आली. त्यामुळे वाहतूक कोंडीत अडकलेल्या प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
मुख्यमंत्र्यांशी बोलणार
या अपघातावर पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरजवळ झालेला दोन खासगी बसचा अपघात ही दुर्दैवी घटना आहे. या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेसंदर्भात आपण माहिती घेतली असून, जिल्हाधिकारी आणि प्रांतांना मदतीच्या सूचना केल्या आहेत. अपघातातील जखमींना तातडीने मदत मिळावी म्हणून आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचं गुलाबराव पाटील म्हणाले. अपघात होऊ नये या संदर्भात चालकांमध्ये जागृती होणे गरजेचे असल्याचेही त्यांनी सांगितलं.