Bus Accident | मुंबईहून बीडला जाणाऱ्या बसला भीषण अपघात, सहा प्रवाशांचा मृत्यू
 
मुंबईहून बीडच्या दिशेने येणाऱ्या सागर ट्रॅव्हल्सच्या बसला भीषण अपघात झाला आहे. बीड जिल्ह्यातील आष्टा फाटा येथे हा अपघात झाला असून यात सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. जवळपास 45 ते 50 प्रवासी यातून प्रवास करत होते. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची माहिती आहे.पहाटेच्या सुमारास मुंबईहून बीडच्या दिशेने येत असताना अष्टा हरिनारायण येथे वळण घेताना हा अपघात झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की ट्रॅव्हल्सची बस 150 फूट घसरत गेली. अपघाताची माहिती मिळताच आमदार सुरेश धस यांनी घटनास्थळी धाव घेतली.
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आष्टी आणि जामखेड येथे जखमींवर सध्या उपचार सुरू आहेत. गंभीर प्रवाशांना अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे.राज्यात खासगी बसला केवळ तीस प्रवाशांची वाहतूक करण्याची परवानगी आहे. त्यामुळे मालकांना परवडत नसल्याने राज्यातील अनेक ट्रॅव्हल मालक नागालँड पासिंग असलेल्या खासगी बस महाराष्ट्रात आणतात. थेट केंद्राची पासिंग परवानगी असल्याने बीडमध्ये वाहतूक पोलीस आणि आरटीओ चे मोठे दुर्लक्ष होते. बीडमध्ये सर्वात जास्त नागालँड पासिंगच्या खासगी बसेस आहेत.
सागर ट्रॅव्हल्सला केवळ 36 प्रवाशांची परवानगी, मात्र 50 प्रवाशी कोंबले
बीडच्या सागर ट्रॅव्हल्सला केवळ 36 प्रवासी वाहतूक करण्याची परवानगी आहे. मात्र ट्रॅव्हल्स मालकांनी तब्बल पन्नास परवाची या बस मध्ये कोंबल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका खासगी सूत्राने दिलेल्या माहितीनुसार बसमध्ये बुकिंग केलेल्या प्रवाशाची संख्या केवळ 15 ते 20 आहे. मग इतर 25 ते 30 प्रवासी कसे बसविले असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यापूर्वीही या सागर ट्रॅव्हल्सकडून अनेक भीषण अपघात झाले आहेत, तरी देखील पोलीस आणि आरटीओ विभागाने या ट्रॅव्हल्स वर कसलीही ठोस कारवाई केली नाही. आजच्या अपघातात जवळपास 40 प्रवाशी जखमी झाले आहेत.
राज्य परिवहन मंडळाकडून अनेक वेळा तक्रार, कारवाई मात्र गुलदस्त्यात
बीडच्या बस स्थानक परिसरापासून कोणत्याही खासगी बसेसला दोनशे मीटर अंतराच्या आत परवानगी नाही. बीडमध्ये मात्र याचे सर्रास उल्लंघन होते केवळ दहा ते पंधरा मीटर अंतरावरच खासगी बसेसने बस्तान थाटले आहे. परिवहन मंडळाच्या नियंत्रक विभाग अधिकाऱ्यांनी या बसेस इतरत्र हलवा म्हणून अनेक वेळा तक्रारी दिल्या आहेत. मात्र बीडच्या वाहतूक पोलिसांनी अद्याप कसलीच कारवाई केली नाही. बीडच्या आरटीओ विभागाने देखील या बसेसची माहिती घेऊन कोणतीही कारवाई केल्याचं समोर आले नाही. आर्थिक देवाणघेवाण केल्याने कारवाई होत नसल्याचे सामाजिक कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे.