CCI 15 मार्चपर्यंत कापूस खरेदी करणार; आतापर्यंत 87 लाख गाठी कापसाची खरेदी

पुणे : खुल्या बाजारात कापसाचे भाव कमी असल्याने सीसीआयला चांगला कापूस मिळत आहे. बाजारात येणाऱ्या कापसापैकी जास्तीत जास्त कापूस सीसीआय खरेदी करत आहे.
आतापपर्यंत देशात सीसीआयने ८७ लाख गाठींची खरेदी केली. त्यापैकी ३९ लाख गाठी कापूस महाराष्ट्रात खरेदी झाला. कापूस मिळाला तर सीसीआय १५ मार्चपर्यंत कापूस खरेदी करेल, असे सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सीसीआयची खरेदी जास्त झाल्याने काही भागात कापूस साठवण्याची समस्या होती. त्यामुळे काही भागात काही दिवस कापूस खरेदी बंद करण्यात आली होती. पण आता खरेदी पुन्हा पुर्ववत सुरु आहे, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सीसीआयची कापूस खरेदी १५ मार्चपर्यंत सुरु राहण्याचा अंदाज आहे. सीसीआयच्या निकषात बसणारा कापूस येईपर्यंत खरेदी सुरु राहील. कापसाची आवक नसल्यास खरेदी हळूहळू थांबविण्यात येईल, असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
सीसीआयने आतापर्यंत ८७ लाख गाठी कापसाची खरेदी केली. मागील संपूर्ण हंगामात जवळपास ३३ लाख गाठी कापसाची खरेदी झाली होती. मागील हंगामात अनेक दिवस खुल्या बाजारात हमीभावाच्या दरम्यान कापसाचा भाव होता. त्यामुळे सीसीआयला कमी कापूस मिळाला.
मात्र यंदा सुरुवातीपासूनच कापसाचा भाव हमीभावापेक्षा कमी आहे. त्यामुळे शेतकरी सीसीआयला कापूस घालत आहेत. परिणामी सीसीआयची खरेदी वाढली आहे. सध्या बाजारात येणारा जास्तीत जास्त कापूस सीसीआयच खरेदी करत आहे. तर खासगी व्यापाऱ्यांना कमी प्रमाणात कापूस मिळत आहे.
देशातील कापूस आवक मागील दोन आठवड्यांपासून दीड लाख गाठींपेक्षा कमी झाली आहे. कापूस आवक १ लाख ३० हजार गाठींच्या दरम्यान दिसत आहे. त्यातही महाराष्ट्रातील आवक सर्वाधिक आहे. महाराष्ट्रात मागील आठवडाभरात दिवसाला ४५ ते ५० हजार गाठींच्या दरम्यान कापूस बाजारात विक्रीसाठी आला होता.
त्यानंतर गुजरात मध्ये आवक आहे. तेलंगणासह दक्षिण भारतातील कापसाची आवक कमी झाली. त्यामुळे सीसीआयची तेथील खरेदीही कमी झाली आहे. महाराष्ट्रातील आवक जास्त असल्याने सीसीआयची खरेदीही जास्त होत आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत सीसीआयने ३९ लाख गाठी कापसाची खरेदी केली.
निकषाप्रमाणे कापूस मिळेल तोपर्यंत सीसीआय कापूस खरेदी करणार आहे. शेतकरी हमीभावाने कापूस विकतील तोपर्यंत सीसीआय खरेदी करणार आहे. सीसीआयची खरेदी १५ मार्चपर्यंत सुरु राहील, असे सीसीआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. मार्चनंतर बाजारातील शेतकऱ्यांची विक्री कमी होईल, असा अंदाज.
सीसीआयची ४६ टक्के खरेदी
देशातील बाजारात ७ फेब्रुवारीपर्यंत १८७ लाख गाठी कापसाची शेतकऱ्यांनी विक्री केली. त्यापैकी सीसीआयने तब्बल ८७ लाख गाठी कापूस खरेदी केला. म्हणजेच आतापर्यंत बाजारात विक्रीसाठी आलेल्या कापसापैकी सीसीआयने तब्बल ४६ टक्के कापूस खरेदी केला आहे.