तूर आणि उडीद डाळींच्या आयातीसंदर्भात केंद्राचा मोठा निर्णय, बाजारभावावर काय होणार परिणाम?
 
एपीएमसी न्यूज डेस्क : सध्या बाजारात तुरीला जवळपास हमीभावापेक्षा जास्त भाव मिळत आहे.मात्र आता लवकरच हे भाव खाली येण्याची चिन्हे आहेत.याचे कारण म्हणजे केंद्र सरकारने तूर आणि उडीद डाळींच्या आयातीवरील शुल्क सवलत आणखी एक वर्ष म्हणजे मार्च २५ पर्यंत वाढविली आहे.त्यामुळे देशातील तुरडाळीचे प्रमाण वाढणार असून सामान्य ग्राहकांना तुलनेत कमी किंमतीत डाळी उपलब्ध होतील. गेल्या आठवड्यात सरकारने मसूरवरील आयात शुल्क सूट २०२५ पर्यंत वाढवली आहे.त्याचा परिणाम या डाळींच्या किंमतीवर होणार आहे.
काय आहे परिपत्रकात
विदेश व्यापार महासंचालनालयाने या संदर्भात परिपत्रक काढले आहे.त्यानुसार येत्या ३१ मार्च २५ पर्यंत तूर आणि उडीद डाळींच्या आयातीवरील शुल्काची सवलत वाढविली आहे. देशातील डाळींच्या किंमती १८ टक्क्यांनी वाढल्या होत्या.तसेच केंद्र सरकारने देशातील सुमारे ८० कोटी जनतेसाठी पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेची मुदत पुढील पाच वर्षांसाठी वाढविली आहे. त्यासाठी डाळींची आवश्यकता असणार आहे.म्हणूनच आयात शुल्कासंदर्भात ऑक्टोबर २१ पासून लागू होणारी ही सवलत आता २१ मार्च २५पर्यंत सुरू राहील. गेल्या आठवड्यात, २३ डिसेंबर रोजी, केंद्राने मसूरडाळीसाठी आयात शुल्क सवलत मार्च २५ पर्यंत एक वर्षाने वाढवली होती.
दरम्यान डीजीएफटीच्या अहवालात असेही नमूद केले आहे की यंदा खरीप हंगामात तूर आणि उडदाचे उत्पादन गेल्या तीन वर्षांतील नीचांकी पातळीवर येऊ शकते.यंदा म्हणजेच २३च्या खरीप हंगामात तूर उत्पादन अंदाजे ३.२२ दशलक्ष टन होण्याची शक्यता आहे. मागच्या वर्षीपेक्षा त्यात २.७ टक्क्यांनी घट झाल्याचे म्हटले आहे. तर उडदाचे उत्पादन मागच्या वर्षी १.७७ दशलक्ष टन होते. यंदा त्यात १.६ दशलक्ष टनांपर्यंत घट होऊ शकते.त्यामुळे देशात डाळींची संभाव्य टंचाई व महागाई होऊ नये म्हणून केंद्राच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालयाने हे पाऊल उचलले आहे.
राज्यातील या आठवड्यातील तुरीचे भाव
या आठवड्यात राज्यातील प्रमुख बाजारसमित्यांमध्ये उडदाची दररोजची आवक सरासरी ५०० क्विंटल होती. तर बाजारभाव कमीत कमी साडेतीन ते चार हजार रुपये प्रति क्विंटल,तर सरासरी सहा ते सात हजार रुपये प्रति क्विंटल असे होते.त्याच प्रमाणे तुरीची आवक सरासरी दहा ते पंधरा हजार क्विंटल अशी होती, तर कमीत कमी बाजारभाव साडेचार ते पाच हजार प्रति क्विंटल,तर सरासरी बाजारभाव सुमारे सहा ते आठ हजार रुपयांपर्यंत आहेत.कृषी विभागाच्या स्मार्ट योजनेच्या बाजार माहिती व जोखीम नियंत्रण कक्षाने दिलेल्या माहितीनुसार मागच्या आठवड्यात बाजारातील तुरीची किंमत हमी भावापेक्षा जास्त असल्याचे दिसून आले. तर यंदा तुरीसाठी मोफत आयात धोरण मार्च २४ पर्यंत वाढविण्यात आले आहे.
आगामी काळात याचा काय परिणाम होईल? 
विदेश व्यापार महासंचालनालयाने   काढलेल्या या परिपत्रकानुसार आयात डाळींना प्रोत्साहन मिळणार आहे. जे व्यापारी तूर,उडीद, मसूर डाळ आयात करतील त्यांना त्यासाठी कमी खर्च येईल. दुसरीकडे देशातील तूरही विक्रीसाठी आता बाजारात येत आहे.यामुळे देशात तुरीची उपलब्धता वाढून तूर डाळीसह,उडीद आणि मसूर डाळींचे भाव आणखी खाली येण्याची शक्यता आहे.
त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या तूरीवरही होण्याची शक्यता असून त्यांना तूरीसाठी कमी दर मिळण्याची शक्यता आहे.दुसरीकडे बाजार माहिती व विश्लेषण विभागाने दिलेल्या माहितीनुसार जानेवारी २४ ते मार्च २४ या कालावधीत लातूर बाजारात तुरीचे दर ७ ते ८ हजार रुपये प्रति क्विंटल राहण्याची शक्यता आहे.