केंद्र सरकारचा गॅस सिलेंडरबाबत सर्वात मोठा निर्णय
नवी दिल्ली | 4 ऑक्टोबर 2023 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील गरीब, होतकरु आणि सर्वसामान्य नागरिकांना पुन्हा एकदा मोठा दिलासा दिला आहे. नरेंद्र मोदी सरकारने लोकसभा निवडणुकीच्या आधी गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी घसरण केली आहे. यावेळी मोदी सरकारकडून करण्यात आलेल्या घोषणेचा फायदा उज्ज्वला योजनेतील कोट्यावधी नागरिकांना होणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबतची घोषणा केली.
केंद्र सरकारने गॅस सिलेंडरच्या सबसिडीत पुन्हा वाढ केलीय. याआधी केंद्र सरकारकडून उज्ज्वला योजनेतील ग्राहकांना 200 रुपये सबसिडी दिली जात होती. आता आणखी 100 रुपयांची सबसिडी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे उज्ज्वला योजनेतील नागरिकांना आता फक्त 600 रुपयात घरगुती गॅस सिलेंडर मिळणार आहे. विशेष म्हणजे सरकारने याआधी 37 दिवसांपूर्वीच याबाबतची मोठी घोषणा केली होती. त्यानंतर पुन्हा एकदा सरकारने निर्णय घेत सर्वसामान्यांना दिलासा दिला आहे.