अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमतीत 10 टक्के कपात; शशिकांत शिंदे यांचा सोडतधारकांकडून सत्कार
नवी मुंबई : सिडकोच्या अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमतीत १० टक्के कपात करण्याचा निर्णय झाल्यानंतर सिडको सोडतधारकांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा सत्कार केला. हा सत्कार सोहळा मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (एपीएमसी) सभागृहात पार पडला.
नवी मुंबईतील सिडको सोडतधारकांनी घरांच्या वाढलेल्या किमतीविरोधात तीव्र आंदोलन करत सातत्याने पाठपुरावा केला होता. या आंदोलनाला शशिकांत शिंदे यांनी सुरुवातीपासूनच पाठबळ देत शासन दरबारी तसेच विधान परिषदेत हा मुद्दा ठामपणे मांडला. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांना यश मिळत अखेर सिडकोने अल्प उत्पन्न गटातील घरांच्या किमतीत १० टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे हजारो कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी बोलताना शशिकांत शिंदे म्हणाले, “मी घरांच्या किमतीत ३० टक्के कपात करण्याची मागणी केली होती. सध्या १० टक्के सवलत मिळाली असली तरी ही सुरुवात आहे. निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी होईपर्यंत तसेच सवलत आणखी वाढवण्यासाठी सातत्याने पाठपुरावा केला जाईल.”
घरांच्या किमती कमी करण्यासाठी विधान परिषदेत केलेल्या पाठपुराव्याबद्दल त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही आभार मानले.
या निर्णयाचा लाभ भविष्यात सुमारे ७० हजार सदनिकाधारकांना होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
या सत्कार सोहळ्याला डॉ. मंगेश आमले, सुरेश शिंदे, नितीन चव्हाण यांच्यासह अनेक सिडको सोडतधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.