CIDCO जमीन घोटाळ्यावर SIT चौकशी रोहित पवारांचे स्वागत – भ्रष्ट माशाला सुटू देणार नाही

मुंबई : राज्यातील सरकारी वनजमिनी बळकवल्याच्या सिडको जमीन घोटाळा प्रकरणाची चौकशी करण्यासाठी राज्य सरकारने विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय म्हणजे 5 हजार कोटी रुपयांच्या या घोटाळ्याविरोधातील निर्णायक पाऊल असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले.
पवार यांनी सांगितले की, स्थानिक भूमिपुत्रांचा लढा आणि कॉन्शियस सिटीझन फोरमसारख्या सामाजिक संघटनांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय शक्य झाला असून सर्वांचेच अभिनंदन करतो.
१२ हजार पानांचे पुरावे, सर्वोच्च न्यायालयाच्या उच्चाधिकार समितीचे पत्र आणि SIT स्थापन – यामुळे आरोपींवर चौफेर सापळा लावला गेला असल्याचे पवार म्हणाले. मात्र, यापूर्वीच्या अनेक SIT चौकशा केवळ वेळ मारून नेणाऱ्या ठरल्या असल्याची शंका त्यांनी उपस्थित केली.
“आम्ही कोणत्याही भ्रष्ट माशाला या प्रकरणातून सुटू देणार नाही,” असा इशारा पवारांनी दिला.
दरम्यान, आरोपी क्र. 2 बिवलकर देश सोडण्याच्या तयारीत असल्याची माहिती देत रोहित पवारांनी सरकारला लुकआउट नोटीस काढून तातडीने अटक करण्याची मागणी केली. अन्यथा बिवलकर पळून गेल्यास त्याची पूर्ण जबाबदारी मुख्यमंत्र्यांवरच येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पुढील मंत्रिमंडळ बैठकीपूर्वी भ्रष्ट मंत्र्यांचा राजीनामा घेतला जाईल का? भ्रष्टाचाराला पाठीशी घालणार की कठोर कारवाई करणार? – याबाबत राज्यभराची नजर मुख्यमंत्र्यांकडे लागली आहे.
शेवटी पवार म्हणाले की, “स्थानिक भूमिपुत्र आणि कुळधारकांनी काळजी करू नये. हा विषय मार्गी लागेपर्यंत आम्ही ठाम उभे राहू.”