Cyclone Biporjoy Landfall : झाडं झुकायला लागली, विजेचे खांब कोलमडले, चक्रीवादळ धडकण्याआधी अंगावर शहारे आणणाऱ्या घडामोडी
 
कच्छ (गुजरात) : बिपरजॉय चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीपासून अवघ्या काही किमीवर अंतरावर आहे. हे चक्रीवादळ आज किनाऱ्यावर धडकणार आहे. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. गुजरातच्या मांडवी येथे प्रचंड वेगाने वारे वाहू लागले आहेत. समुद्र प्रचंड खवळला आहे. काही ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. वाऱ्याचा वेग इतका वाढलाय की किनाऱ्यावरील झाडं अक्षरश: झुकायला लागली आहेत. वारे इतक्या जोरात वाहत आहेत की किनाऱ्यावर उभं राहणं कठीण होऊन बसलं आहे. अजूनही चक्रीवादळ किनाऱ्यापासून 110 किमी अंतरावर आहे. ते गुजरातच्या किनारपट्टीच्या दिशेला पुढे सरकत आहे. हे चक्रीवादळ आज संध्याकाळी सहा ते रात्री आठ वाजेच्या सुमारास किनाऱ्यावर धडकण्याची शक्यता आहे. त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत त्याचा प्रभाव असणार आहे.
गुजरातच्या सौराष्ट्र, कच्छ, द्वारका येथे बिपरजॉयचा तडाखा बसायला सुरुवात झाला आहे. समुद्र प्रचंड खवळलाय. समुद्रात उंचच्या उंच लाटा बघायला मिळत आहेत. मुसळधार पावसाला सुरुवात झालीय. वाऱ्याचा वेग इतका भयानक आहे की अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले आहेत. त्यामुळे संबंधित परिसरात वीज पुरवठा खंडीत झालाय. हे संकट फार मोठं आहे. चक्रीवादळाचा प्रभाव जास्त असला तर मोठी हानी होऊ शकते. प्रशासनाने आतापर्यंत हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं आहे. नागरिकांना घरातच राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
बिपरजॉय चक्रीवादळाचा तडाखा गुजरातला जास्त होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या चक्रीवादळामुळे मुंबई, कोकणासह, गुजरातच्या नवसारी, द्वारका, सूरत, मांडवी सारख्या भागांमध्ये समुद्र खवळला आहे. समुद्रातील लाटा इतक्या उंच आहेत त्या पाहून मनात धडकी भरतेय.
नागरिकांना चक्रीवादळाचं गांभीर्य नाही
दरम्यान, चक्रीवादळ एकीकडे पुढे सरकरत आहे. तर दुसरीकडे नागरिकांना त्याचं गांभीर्यच नाही, असंही मांडवी येथे बघायला मिळत आहे. खरंतर चक्रीवादळाच्या झळा काय आहेत हे मुंबई, कोकण किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना जास्त माहिती आहेत. कोकणात तर चक्रीवादळाने काय हाहाकार माजवला होता याचा साक्षीदार संपूर्ण महाराष्ट्र आहे. महाष्ट्राची तिथली स्थानिक जनता, अनेक नेतेमंडळी त्याचे साक्षीदार आहेत.
ओडिशा, पश्चिम बंगालच्या किनाऱ्यावरील नागरिकांनीदेखील चक्रीवादळाची झळ सोसलीय. त्यामुळे चक्रीवादळ येतं तेव्हा किती संकट सोबत घेऊन येतं याची कल्पनी न केलेली बरी. पण गुजरातच्या मांडवी किनारपट्टी पासून काही अंतरावर राहणाऱ्या नागरिकांना या चक्रीवादळाच्या संकटाची जाणीव नाहीय. ते मोकळेपणाने रस्त्यावर फिरताना दिसत आहेत.
अनेकजण वातावरण चांगलंय म्हणून समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर असलेल्या रस्त्यावर फिरायला आले आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाने नागरिकांना घरातच राहण्याची सूचना दिली आहे. पण तरीही अनेक नागरिकांना या गोष्टीचं गांभीर्य नाही हेच दिसत नाही.