समृद्धीच्या कामामुळे स्थानिक शेतीचे नुकसान
 
तालुक्यातील मौजे पिंपळगाव मोर येथे सुरू असलेल्या समृद्धी महामार्ग व पुलाच्या कामासाठी स्थानिक शेतकऱ्यांच्या शेतातील माती उपसा करून शेत जमिनींचे नुकसान केले.
त्यामुळे शेती कशी करायची व पाणी कसे भरायचे, अशा पेचात अडकलेल्या शेतकऱ्यांनी अनेक वेळा समृद्धी कंपनी व्यवस्थापनाकडे तक्रार केली.
मात्र कंपनी प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याने ग्रामस्थांनी मंगळवारी (ता. ४) शेतकरी संघटनेच्या नेतृत्वात तहसीलदार अभिजित बारावकर यांना निवेदन देत उपोषणाचा इशारा दिला.
समृद्धी कामासाठी अनेकांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या. राहिलेल्या शेत जमिनीतून गौण खनिज उत्खनन करण्यात येत आहे. समृद्धी महामार्ग व्यवस्थापनाच्या विविध ठेकेदारांनी मनमानी पद्धतीने काम करून अनेक शेतकऱ्याच्या पाइपलाइन तोडून त्यावर दगड मातीचे ढिगारे तयार केले आहेत.
२०२१ पासून समृद्धी कंपनीमुळे संपादित जमिनी सोडून इतर क्षेत्रात मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान करून खासगी पाइपलाइन, माती दगडाखाली दाबून गावाचा पाणीपुरवठा बंद केला आहे. झालेल्या नुकसानीची भरपाई द्यावी अन्यथा तहसील कार्यालयासमोर उपोषण करू, असा इशारा निवेदनात देण्यात आला.
तालुक्यातील राजकीय व गुंड प्रवृत्तीच्या लोकांकडून शेतकऱ्यांवर दबाव तंत्र वापरून समृद्धी व्यवस्थापन प्रशासनाची व शेतकऱ्यांची दिशाभूल करीत असल्याचेही याप्रसंगी शेतकरी म्हणाले.