दसऱ्यानिमित्त झेंडू बाजारात रंगत – दर स्थिर, मात्र चांगल्या फुलांना मागणी
.jpeg)
-पावसाचा फटका झेंडूला – तरीही दसऱ्याच्या बाजारात रंगत
-झेंडू, तोरण व पूजेच्या साहित्याला दसऱ्याच्या दिवशी मोठी मागणी
-दसऱ्यानिमित्त फुलबाजारात ग्राहकांची गर्दी झेंडू ५० ते १०० रुपयांत
नवी मुंबई : दसऱ्यानिमित्त शहरातील फुलबाजारात झेंडूची मोठी मागणी दिसून आली. बुधवारी पहाटेपासूनच बाजारपेठेत खरेदीसाठी ग्राहकांची विशेष गर्दी झाली. झेंडूची फुले ५० ते ८० रुपये किलो, तर तोरण ३० रुपये मीटर दराने विक्री होत असल्याचे चित्र बाजारात पाहायला मिळाले.
या वर्षी अतिवृष्टीमुळे फुलांचे मोठे नुकसान झाले असून, पाणी लागल्याने अनेक फुले खराब अवस्थेत बाजारात आली आहेत. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या फुलांना थोडा जास्त दर मिळत आहे. किरकोळ पातळीवर चांगल्या झेंडूची किंमत ८० ते १०० रुपये किलो, तर दुसऱ्या प्रतीच्या फुलांची विक्री ३० ते ५० रुपये किलो दराने होत आहे.
मुंबईच्या दादर फुलबाजाराबरोबरच नवी मुंबईतील एपीएमसी बाजार, तसेच फुटपाथवरही शेतकरी थेट विक्री करत आहेत. नाशिक, सातारा आदी पट्ट्यांतून आलेल्या शेतकऱ्यांनी फुलांच्या पिकअप गाड्या बाजारात आणल्याने सकाळपासूनच उत्सवी माहोल अनुभवायला मिळाला.
दसऱ्याच्या दिवशी वाहन पूजन व अन्य धार्मिक पूजेसाठी झेंडू, आंब्याची पाने, आपटे पाने, कोंबडा, भात ओंब्या यांची मागणी वाढते. यंदा बाजारात आंबा पान तोरण ५० ते ७० रुपये मीटर, आपटे पाने २० रुपये, कोंबडा २० रुपये, तर भात ओंब्या २० रुपये दराने विक्री होत आहे.