राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारात मंत्रिमंडळात कोणत्या 12 नेत्यांना संधी मिळेल बाचा सविस्तर बातमी.
 
 
राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हाही होणार असल्याची चर्चा
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने शिंदे-फडणवीस सरकारला मिळालं अभय
तब्बल एक वर्षानंतर हा विस्तार होणार
मंत्रिमंडळात 12 जणांना संधी मिळणार
मुंबई: राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केव्हाही होणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे या विस्ताराकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. या शिवाय नव्या विस्तारात आशिष शेलार, नितेश राणे आणि गोपीचंद पडळकर यांना संधी मिळणार असल्याचं सांगितलं जात आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारला अभय मिळालं आहे. त्यामुळे आता राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. राज्य सरकारने त्याची तयारी सुरू केली आहे. तब्बल एक वर्षानंतर हा विस्तार होणार आहे. विस्ताराची तारीख जाहीर करण्यात आली नसली तरी सरकार पातळीवर तशी लगबग सुरू झाली आहे. एवढेच नव्हे तर या नव्या विस्तारात 12 जणांचा शपथविधी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. या संभाव्य मंत्र्यांची नावेही व्हायरल झाली आहेत. त्यामुळे कुणाकुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.नव्या मंत्रिमंडळात 12 जणांना संधी मिळणार असल्याची चर्चा आहे. त्यात शिंदे गटाकडून भरत गोगावले, संजय शिरसाट, राजेंद्र पाटील यड्रावकर, आणि बच्चू कडू यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. भरत गोगावले यांचं प्रतोदपद गेल्याने त्यांना मंत्रिमंडळात स्थान दिलं जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. गोगावले यांचा मंत्रिमंडळात स्थान दिल्यास कोकणातील मंत्र्यांची संख्या तीन होणार आहे. उदय सामंत आणि दीपक केसरकर हे विद्यमान मंत्रिमंडळात मंत्री आहेत. शिंदे गटाकडून आणखी कुणाला संधी मिळणार हे अजून स्पष्ट झालेलं नाही.तर भाजपकडून आशिष शेलार, नितेश राणे, प्रवीण दरेकर, गोपिचंद पडळकर, मनिषा चौधरी, मदन येरावार, संजय कुटे, संभाजी निलेंगकर पाटील, मेघना बोर्डीकर आणि राणा जगजितसिंह यांना मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. आशिष शेलार हे फडणवीस सरकारमध्ये मंत्री होते. पण त्यांना अल्पकाळ मिळाल्याने त्यांना पुन्हा संधी देण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे. तर प्रवीण दरेकर हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते, त्यामुळे त्यांनाही संधी दिली जात असल्याचं समजतं. विद्यमान सरकारमध्ये एकही महिला मंत्री नाही. त्यामुळे मनिषा चौधरी आणि मेघना बोर्डीकर यांचा मंत्रिमंडळात समावेश होऊ शकतो, असं सांगितलं जात आहे.