सिडकोच्या खारघर प्लॉट वाटप प्रकरणावर ED ची नजर; चौकशीसाठी ED ची CIDCO ला नोटीस
.jpeg)
-60 कोटींचा प्लॉट, दोन दावे, एकच भूखंड
-ED चौकशीत शिरीष घरत, सिडकोच्या भूमी वाटपावर प्रश्नचिन्ह
-60 कोटींच्या प्लॉट प्रकरणात ED सक्रिय CIDCO कडून कागदपत्रांची मागणी
नवी मुंबई ,एपीएमसी न्यूज़ नेटवर्क : सिडकोच्या भूखंड वाटप प्रक्रियेत कथित गैरव्यवहाराच्या चौकशीत अंमलबजावणी संचालनालय (ED) आता प्रत्यक्ष उतरले आहे. खारघर सेक्टर ७ मधील तब्बल २,५०० चौ.मी. क्षेत्रफळाचा भूखंड हा वादग्रस्त ठरलेला असून, त्याची किंमत सुमारे ६० कोटी रुपयांवर असल्याचे सांगितले जात आहे.
शिरीष घरत यांनी ‘वन फॉर वन’ धोरणाअंतर्गत बेळपाडा येथील जमीन न घेण्यात आल्याचा दावा करत सिडकोकडून हा प्लॉट घेतला. मात्र नंतर सिडको अधिकाऱ्यांनी त्याच जमिनीची विक्री खाजगी विकसकाला केल्याचे पुरावे सादर करत, घरत यांच्यावर फसवणुकीचा आरोप करत पोलिसांत तक्रार दाखल केली. त्या वेळी नागरी वसाहत अधिकारी आशा बानसोडे यांनी अधिकृतरित्या तक्रार दिली होती. परिणामी सिडकोने वाटपाचा करार रद्द केला होता.
मात्र नंतर उच्च न्यायालयातून घरत यांना दिलासा मिळाल्याने प्लॉट परत देण्यात आला. या पार्श्वभूमीवर सध्या सुरू असलेल्या पोलिस तपासात ED ने उडी घेत सर्व संबंधित कागदपत्रांची मागणी केली आहे. सिडकोच्या अधिकाऱ्यांनीही ही बाब मान्य करत ED ला प्रतिसाद दिला असल्याचे सांगितले.
दरम्यान, या भूखंडासंदर्भात विदर्भ इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. आणि घरत यांच्यात सध्या न्यायालयीन संघर्ष सुरू आहे. कंपनीच्या संचालकाने घरत यांच्यावर फसवणुकीचा आरोप केला आहे, तर घरत यांनी सिडकोच्या भूमी अधिग्रहण प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा दावा केला आहे.
सिडकोने अद्याप अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र ED च्या चौकशीनंतर हा संपूर्ण व्यवहार नव्याने उघडकीस येण्याची शक्यता आहे.